हिमाचल प्रदेशात आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आलं असून सीआयडीने याप्रकरणी इंडियन टेक्नोमॅक कंपनी लिमिटेडचा संचालक विनय कुमार शर्मा याला अटक केली आहे. जवळपास सहा हजार कोटींचा हा घोटाळा आहे. विनय कुमार शर्मा हा माजी आयएएस अधिकारी एम एल शर्मा यांचा मुलगा आहे. मंगळवारी सीआयडीने ऊना येथून त्याला अटक केली. विनय कुमार याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पांवटा साहिब येथील स्थानिक न्यायालयात हजर केलं असता, त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

राज्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या चार वर्षांपासून राज्यातील वेगवेगळ्या तपास यंत्रणा या घोटाळ्याचा तपास करत होत्या. मार्च २०१४ मध्ये कंपनीने अचानक एक दिवस काम थांबवलं आणि बस्ता गुंडाळून गायब झाले. जगतपूर गावातील पांवटा साहिब येथे कंपनीचं युनिट होतं. कंपनीने कर्मचा-यांचे ईपीएफ, सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स सगळं काही थकवलं आणि पळून गेले. ही रक्कम कोटींच्या घरात आहे.

सीआयडी टीम सध्या मुख्य आरोपी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक राकेश कुमार शर्मा याचा शोध घेत आहे. राकेश कुमार शर्मा देश सोडून पळून गेल्याची शक्यता आहे, मात्र सीआयडीकडे याबाबत खात्रीलायक माहिती नाही. सध्या देशभरात नीरव मोदी १२ हजार कोटींचा घोटाळा करुन देश सोडून पळून गेल्याची चर्चा सुरु असतानाच हा घोटाळा समोर आला आहे. इंडियन टेक्नोमॅक कंपनीचा एकूण घोटाळा सहा हजार कोटी आहे.

जवळपास १५ पानांच्या तक्रारीत कंपनीच्या व्यवस्थापकासहित तिघांचं नाव आहे. एफआयआरमध्ये  कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक राकेश कुमार शर्मा, विनय शर्मा, रंगनाथ श्रीवासन आणि अश्विनी कुमार यांची नावं आहेत. पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत २१७५ कोटी ५१ लाखाच्या घोटाळ्याची माहिती देण्यात आली आहे. सोबतच वेगवेगळ्या बँकांकडून २३०० कोटी आणि आयकर विभागाचे ७८० कोटी बुडवण्यात आले आहेत. संपुर्ण मिळून हा घोटाळा जवळपास सहा हजार कोटींचा आहे.