पावसाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच मान्सूनपूर्व पावसामध्येच मुंबईतील लोकल ट्रेनचे वेळापत्रक वारंवार कोलमड असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळपत्रकाचा फटका ऑफिसला जाणाऱ्यांना बसत आहे. ऑफिसमध्ये लवकर पोहचण्याच्या इराद्याने घरुन लवकर निघाल्यानंतरही अनेकांना केवळ रेल्वे उशीरा धावत असल्याने लेटमार्क लागतोय. यासंदर्भातील नाराजी अनेकांनी सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन व्यक्त केली आहे. याच सोशल नेटवर्किंग साईटवर काहींनी ऑफिसला जाण्यासाठी लागणारा प्रवासाचा वेळ हा ऑफिसचे तास म्हणजेच वर्किंग अवर्स म्हणून ग्राह्य धरले जावे असे मतही व्यक्त केले आहे. मात्र हे केवळ मुंबईकरांचे मत नसून याचवर्षी घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये देशातील ६१ टक्के कर्मचाऱ्यांनी ऑफिसला येण्याजाण्याची वेळ ही ‘वर्किंग अवर्स’मध्ये ग्राह्य धरण्यात धरावी असे मत व्यक्त केले आहे.

इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुपने (आयडब्लूजी) केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये ऑफिसला जाणाऱ्या ६१ टक्के लोकांनी प्रवासाचा वेळ हा कार्यालयीन वेळाचा भाग म्हणून ग्राह्य धरला जावा असे मत नोंदवले आहे. याच सर्वेक्षणामध्ये भारतामधील ८० टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कामाच्या वेळांसंदर्भात असणारे निर्बंध शिथिल केले असल्याचे म्हटले आहे.

पीटीआयने यासंदर्भात दिलेल्या वृत्तामध्ये अनेकांनी ऑफिसला जाण्यासाठी प्रवासात दिवसोदिवस जास्तीत जास्त वेळ घालवाला लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सर्वेक्षणातील ४१ टक्के कर्मचाऱ्यांनी घरुन ऑफिसला आणि ऑफिसमधून घरी जाण्यासाठी लागणारा वेळ खूप अधिक असून त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. असे असतानाच ५८ टक्के कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये कामाच्या वेळेसंदर्भातील नियम शिथिल करण्यात आले असून फ्लेक्झीबल वर्कप्लेस धोरण स्वीकारले असल्याचे मान्य केले.

‘आयडब्लूजी’ने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये ८० देशांमधील १५ हजार कर्मचाऱ्यांनी आपली मते नोंदवली आहेत. या सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये सध्याच्या कंपन्यांसमोर वेळेसंदर्भात आडमुठी भूमिका घेतल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात आणि हेच कंपन्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय कामाच्या वेळा कर्चमाऱ्यांची सोय लक्षात घेऊन ठेवल्यास त्याचा कंपनीला फायदा होतो असं मत ८५ टक्के उद्योजकांनी व्यक्त केले आहे. कामाच्या वेळा शिथिल केल्याने बाळांपणानंतर कंपनी सोडून जाणाऱ्या महिलांचे प्रमाण घटले असून अनेक ठिकाणी निवृत्तीच्या वयानंतरही कर्मचारी काम करण्यास तयार होतात असंही या अहवालात म्हटलं आहे. ‘ऑफिसला येणाऱ्या कर्चमाऱ्यांना वेळेची सवलत दिसल्यास त्याचा फायदा कर्मचारी आणि कंपन्यांनाही होतो. खास करुन वाहतूककोंडी आणि गर्दी असणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करुन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत सूट दिल्यास ते ऑफिसला येताना अधिक ताजेतवाने आणि उत्साही असतात,’ असे निरिक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहेत.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अनेकांनी नेहमीच वेळत ऑफिसला पोहचण्याचा प्रयत्न असतो असं सांगितलं आहे. ‘आम्ही ऑफिसला येताना प्रवासातही ऑफिसचे काम करतो’ असं ४८ टक्के कर्चमाऱ्यांनी या सर्वेक्षणात सांगितले आहे. तर ३३ कर्मचाऱ्यांनी आपण ऑफिसला येताना प्रवासात पुस्तके वाचत असल्याचे सांगितले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पाच पैकी दोन जणांनी ऑफिसला पोहचण्यासाठी करावा लागणार प्रवास हाच त्यांच्या कामासंदर्भातील सर्वात वाईट भाग असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी भविष्यात ऑफिसला न येताच काम करणे शक्य होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. २०३५ पर्यंत ऑफिसला न जाताच काम करणे शक्य होईल असे मत या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांनी नोंदवले आहे. ऑफिसात न जाता काम करता येईल असे मत नोंदवणाऱ्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कर्मचाऱ्यांचा आकडा सर्वाधिक असून येथील ७९ टक्के कर्मचाऱ्यांनी ऑफिसला न जाता काम करता येईल अशी आशा व्यक्त केली आहे. आयडब्लूजी चे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष मार्क डेक्सन यांनी आठवड्यातील अर्ध्याहून अधिक काळ आम्ही मुख्य ऑफिसऐवजी इतर जागांवरुन काम करतो असे म्हटले आहे. नवीन कॉर्पोरेट संस्कृतीमध्ये कामाच्या वेळांसंदर्भात लवचिकता ठेवणे हे अलिखित नियमच झाला असल्याचे मत डेक्सन यांनी व्यक्त केले आहे.