नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४९ प्रतिभावंतांनी पत्र लिहून देशात वाढत्या मॉब लिचिंगच्या घटना रोखण्याची मागणी करत निषेध व्यक्त केला होता. दरम्यान या पत्राला ६१ सेलिब्रेटींनी उत्तर देत खुलं पत्र लिहिलं आहे. काही मोजक्या प्रकरणांचा निषेध आणि विरोध करण्यात येत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. या पत्राचं शिर्षक ‘Against Selective Outrage and False Narratives’ असं देण्यात आलं आहे. पत्र लिहिणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये अभिनेत्री कंगना रणौत, गीतकार प्रसून जोशी, क्लासिकल डान्सर आणि खासदार सोनल मानसिंह, वाद्य पंडित विश्वमोहन भट्ट, दिग्दर्शक मधूर भंडारकर आणि विवेक अग्निहोत्री यांचा समावेश आहे.

या पत्रातून विचारणा करण्यात आली आहे की, जेव्हा नक्षलवादी आदिवासींना लक्ष्य करतात तेव्हा हे लोक शांत का राहतात ? पुढे लिहिलं आहे की, जेव्हा काश्मीरमध्ये फुटीरतावादी शाळा बंद केल्या तेव्हा हे लोक कुठे गेले होते ? यासोबतच जेएनयूमध्ये करण्यात आलेल्या घोषणाबाजीवरुनही  प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. जेव्हा देशाचे तुकडे होतील अशी घोषणा देण्यात आली तेव्हा तुम्ही तुमचं म्हणणं का ना मांडलं अशी विचारणा पत्रात करण्यात आली आहे.

झुंडबळींच्या घटना तात्काळ रोखा!

याआधी ४९ प्रतिभावंतांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहित देशातील अल्पसंख्यांक आणि दलितांविरोधात मॉब लिचिंगच्या घटना वाढत असल्याचं म्हटलं होतं. मुस्लीम, दलित व इतर अल्पसंख्याकांच्या झुंडबळीच्या घटना तात्काळ थांबवण्यात याव्यात, असे आवाहन देशातील ख्यातनाम व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहून केले होते. ‘मतभेदांशिवाय लोकशाही असू शकत नाही’, असेही त्यांनी म्हटले होते. ‘जय श्रीराम’ ही घोषणा आता केवळ युद्धाची प्रक्षोभक घोषणा झाली असल्याचेही चित्रपट निर्माते श्याम बेनेगल व अपर्णा  सेन, शास्त्रीय गायिका शुभा मुदगल आणि इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांच्यासह ४९ प्रसिद्ध व्यक्तींनी लिहिलेल्या पत्रात म्हटले.

पत्रात काय लिहिलं होतं ?

शांतीप्रिय भारतीय नागरिक म्हणून, आमच्या देशात  अलीकडच्या काळात घडत असलेल्या दु:खद घटनांबाबत आम्ही अतिशय चिंतित आहोत. अल्पसंख्याकांच्या झुंडबळीच्या घटना तात्काळ थांबल्याच पाहिजेत. २०१६ साली दलितांविरुद्ध अत्याचाराच्या किमान ८४० घटना घडल्याचे आणि यातील दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण घटल्याचे ‘एनसीआरबी’कडून कळल्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे, असे पत्रात नमूद केले होते.

‘जय श्रीराम’ ही केवळ युद्धाची प्रक्षोभक घोषणा ठरल्याबाबत खंत व्यक्त करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्दय़ावर निष्क्रिय असल्याचा आरोपही या मान्यवरांनी केला. राम हा बहुसंख्याक समुदायासाठी पवित्र आहे. रामाचे नाव अपवित्र करणे थांबवा, असेही त्यांनी म्हटले.