दहशतवादविरोधी तपासासाठी ओबामा प्रशासनाने उचललेले गुप्त टेहळणी कार्यक्रमाचे पाऊल जगभरात वादग्रस्त ठरले असले तरीही अमेरिकेच्या नागरिकांनी मात्र या कार्यक्रमास पाठिंबा दर्शविला आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यप्रेमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशातील नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव व्यक्तिगत स्वातंत्र्यावर र्निबध आले तरी हरकत नसल्याचे मत नोंदविले आहे.
प्यू रिसर्च सेंटर आणि द वॉशिंग्टन पोस्ट या दोघांच्या वतीने गुप्त टेहळणीच्या मुद्दय़ास अनुसरून एक सर्वेक्षण केले गेले. या सर्वेक्षणात अमेरिकेच्या ६२ टक्के नागरिकांनी ओबामा प्रशासनाचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

सर्वेक्षणाचे निष्कर्ष
गुरुवार ते रविवार या कालावधीत १००४ प्रौढांची मते यासाठी विचारात घेतली गेली. नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचे फोनटॅपिंगचे पाऊल योग्यच असल्याची प्रतिक्रिया ५६ टक्के नागरिकांनी व्यक्त केली. तर ४१ टक्क्यांनी हे पाऊल चुकीचे असल्याचे सांगितले. ३० टक्के जणांनी हे पाऊल उचलण्याची निकड होती असे सांगितले, तर २६ टक्के जणांनी अपरिहार्यतेपोटी आपण याचा स्वीकार करीत असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे ११ सप्टेंबर रोजी ट्विन टॉवर्सवर झालेल्या हल्ल्यानंतर घेण्यात आलेल्या आणि रविवारी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणांचे निष्कर्ष तंतोतंत जुळले आहेत.

सर्वेक्षणासाठीचे प्रश्न
* नॅशनल सिक्युरिटी एजन्सीद्वारे फोनकॉल रेकॉर्ड योग्य आहे का?
* दहशतवाद रोखण्यासाठी अधिक कडक उपाय हवेत का?
* व्यक्तिगत स्वातंत्र्यावर अशी मर्यादा योग्य आहे का?