भगवान हनुमानाला संकटविमोचक म्हटले जाते. पण खुद्द हनुमंतालाच कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील आदर्श अाचारसंहितेचा फटका सहन करावा लागला. कर्नाटकातील निवडणुकीमुळे तब्बल पंधरा तास राष्ट्रीय महामार्ग ४८ वर हनुमंताची मुर्ती अडकून पडली होती. ६२ फूट लांब ७५० टन वजनाची हनुमंताची भव्य मुर्ती असलेला ट्रक राष्ट्रीय महामार्ग ४८ वर पोलिसांनी रोखून धरला होता. कोलारहून पूर्व बंगळुरुतील काचारकानाहल्ली येथे चाललेला हा ट्रक सोमवारी रात्री पोलिसांनी आदर्श अचारसंहितेचे कारण देऊन रोखला.

हनुमंताच्या या मुर्तीमुळे अाचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते असे पोलिसांचे म्हणणे होते. बंगळुरुपासून ३५ किलोमीटर अंतरावर होसकोटे येथे हा ट्रक थांबवण्यात आला होता. अखेर निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केल्यानंतर मंगळवारी दुपारी पोलिसांनी या ट्रकला काचारकानाहल्लीला जाण्यासाठी परवानगी दिली.

श्री राम चैतन्य वर्धीनी ट्रस्टची ही हनुमानमुर्ती आहे. हनुमंताचा हा ट्रक अडवल्याने एनएच ४८ वर वाहतूक कोंडी झाली होती. ट्रस्टने बंगळुरु महापालिकेकडे ही हनुमान मुर्ती आणण्यासाठी परवानगी मागितली होती. बंगळुरु महापालिकेने ट्रस्टला रस्त्याचे नुकसान न करण्याच्या अटीवर परवानगी दिली होती. रस्त्याचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी ट्रस्टची असेल असे स्पष्ट करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी वाहतूक पोलिसांनी ट्रस्टकडे मुर्ती ट्रान्सपोर्ट करण्याच्या सर्व परवानग्या आहेत कि, नाहीत ते तपासण्यासाठी ट्रक रोखला. अखेर मंगळवारी दुपारी त्यांनी परवानगी दिली.