सर्वसामान्यांनादेखील परवडणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये झालेली भरमसाठ वाढ सोशल मीडियाच्या पथ्यावर पडली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारतातील ६.२० कोटी मोबाईलधारक जून २०१३ अखेर ‘फेसबुक’चा वापर करत असल्याचे समोर आले आहे.
कॅलिफोर्नियास्थित संस्थेने सादर केलेल्या ‘फेसबुक’च्या मासिक सक्रिय वापरकर्त्यांच्या (एमएयू) अहवालामध्ये ही आकडेवारी देण्यात आली आहे. मागील वर्षी ३० जून २०१२ मध्ये भारतातील ७.८० कोटी लोक ‘फेसबुक’चा वापर करत होते. यावर्षी त्यामध्ये ५ टक्क्यांची भर पडली असून, भारतामध्ये ‘फेसबूक’चा वापर करणाऱ्यांची सर्वसाधारण संख्या ३० जून २०१३ पर्यत ८.२० कोटी होती. त्यापैकी ६.२० कोटी वापरकर्ते ‘फेसबूक’चा वापर त्यांच्याजवळील मोबाईल फोनद्वारे करतात. यावर्षी मोबाईलद्वारे ‘फेसबूक’ वापककर्त्यांमध्ये १ कोटीपर्यंत वाढ होण्याची शक्यता ‘फेसबुक’ने वर्तवली आहे. जगभरात मोबाईलद्वारे फेसबूक वापरणाऱय़ांची संख्या ८०.१९ कोटी एवढी प्रचंड आहे.
“सर्वच देशांमध्ये ‘फेसबुक’चा मोबाईलद्वारे होणारा वापर वाढला आहे. भारत, ब्राझील आणि इंडोनेशियामध्ये यांचा यामध्ये महत्वाचा वाटा आहे”, अशी माहिती ‘फेसबुक’ने दिली.
“भारतामध्ये मोबाईल स्मार्टफोन स्वस्त झाल्यामुळे व इंटरनेट कनेक्शन सहज उपलब्ध होत असल्यामुळे फेसबुकच्या वापर झपाट्याने वाढला”, अशी माहिती फेसबुकचे भारतातील व्यवस्थापक केव्हिन डिसोझा यांनी सांगितले.