अमेरिका : अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्निया भागात वणव्यामुळे आतापर्यंत लागलेल्या आगीत मरण  पावलेल्यांची संख्या ६३ झाली असून एकूण ६३१ लोक बेपत्ता आहेत. अमेरिकेच्या इतिहासात या शतकातील सर्वात भीषण वणवे पेटल्याने मृतांची संख्या आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. अनेक जण आगीमुळे पळून गेले आहेत, ते बेपत्ता असून त्यांचा ठावठिकाणी नाही.

बुटे परगण्याचे प्रमुख कोरी होनिया यांनी सांगितले, की जे लोक बेपत्ता आहेत त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ते सुरक्षित असतील तर तसे सांगावे. आम्ही अभूतपूर्व परिस्थितीस तोंड देत असून लोकांची मोजदाद करण्याच्या विचारात आहोत. एकूण ५२ हजार लोक वणव्यामुळे पसरलेल्या आगीत विस्थापित झाले आहेत. काही जण मित्र व नातेवाइकांकडे गेले असून काहींनी मोटेल्समध्ये आश्रय घेतला आहे.

काही जण तर वॉलमार्टच्या पार्किंगमध्ये राहत आहेत. उत्तर कॅलिफोर्नियातील वणवा आठवडाभरापूर्वी पसरत गेला असून पॅराडाइज येथे मोठय़ा प्रमाणात आगी लागल्या. जळालेल्या घरातून अनेक मृतदेह बाहेर काढले असून मृतांची संख्या ६३ आहे. ९८०० घरे जळून राख झाली आहेत.

वणव्यामुळे लागलेल्या आगी विझवण्यात ४० टक्के यश आले असून अजूनही लोकांना परत येण्यासारखी परिस्थिती नाही.

वीजपुरवठा खंडित असून अग्निशमन बंब अजून आगी विझवत आहेत. पॅराडाइज येथील अ‍ॅना गुडनाइट यांनी पार्किंगमध्ये उलटलेल्या मोटारीच्या टपावर बसून स्क्रॅम्बल्ड एगचा आस्वाद घेतला. तिच्या पतीने बुडवेसर सेवन केले. नंतर इतर लोकांची अवस्था कशी असेल, या आठवणीने तो हमसून हमसून रडू लागला व आपण भाग्यवान आहोत, असे सांगू लागला. अनेक ठिकाणी अन्नाच्या गाडय़ांवर मोफत जेवण देण्यात आले. काहींनी वॉलमार्टच्या विश्रामगृहांचा वापर केला.