विशाखापट्टणममध्ये पोलिसांनी चक्क ६३ हजार ८७८ किलो गांजा जाळून नष्ट केला. ‘द हिंदू’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मागील दहा वर्षांमध्ये ४५५ प्रकरणांमध्ये जप्त केलेला १५ कोटींचा गांजा जाळून टाकला. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जाळल्याने कापुलूपाडा डम्पिंग ग्राऊंडवर अनेक तास धुराचे सम्राज्य होते असंही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

विशाखापट्टणम जिल्ह्यामधील वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेला गांजा मागील अनेक वर्षांपासून पडून होता. अखेर पोलिसांनी तो शुक्रवारी एकत्र करुन जाळला. यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये जप्त करण्यात आलेला गांजा गाड्यांमधून गोळा करुन कापुलूपाडा डम्पिंग ग्राऊंडवर आणण्यात आला. गोण्यांमध्ये भरलेल्या या गांजाचे वजन करण्यात आल्यानंतर त्याला आग लावण्यात आली.

विशाखा विभागाचे उप महानिरीक्षक एल. के. व्ही रंगा राव यांनी द हिंदूला या कारवाईसंदर्भात माहिती दिली. ‘मागील वर्षी आम्ही ४१ हजार ३४१ किलो गांजा नष्ट केला होता. मात्र यंदा आम्ही ६३ हजार किलोहून अधिक गांजा नष्ट केला आङे. आत्तापर्यंतची ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे. गांजा तस्करी करणारे लोक राज्यातील अंतर्गत भागातील शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. सरकारनेही शेतकऱ्यांनी गांजा शेती करु नये आणि त्याऐवजी अधिक नफा मिळवून देणाऱ्या पिकांची लागवड करावी यासाठी जनजागृती मोहिम सुरु केली आहे,’ असं राव यांनी सांगितले.

मागील दोन वर्षांमध्ये जिल्ह्यामध्ये पोलिसांना जप्त केलेला गांजा जाळून नष्ट करण्याची ही चौथी वेळ आहे. मागील वर्षी २७ फेब्रुवारी रोजी ११ हजार ४९३ किलो, १३ मार्च रोजी ७ हजार ६३७ किलो आणि ३ ऑगस्ट रोजी ४३ हजार ३४१ किलो गांजा पोलिसांनी अशाच प्रकारे जाळून नष्ट केला आहे. गांजा जाळण्याबरोबर पोलिसांनी या प्रकऱणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या १९६ गाड्यांचा लिलावही केला आहे.