भारतात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही आठवड्यांनी या विषाणूचा संसर्ग झपाट्यानं वाढला. करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पीपीई किटची मागणी वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं परदेशातून पीपीई किट मागवण्याचा निर्णय घेतला होता. त्यात चीनमधून ६३ हजार पीपीई किट भारतात आल्या असून, त्या आखून दिलेल्या नियमांची पूर्तता न करताच पाठवल्या असल्याचं समोर आलं आहे. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं हे वृत्त दिलं आहे.

करोनाचा उपद्रव झाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात पीपीई किट, एन-९५ मास्क आणि व्हेटिंलेटरची गरज निर्माण झाली. त्याचा तुटवठा निर्माण झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी याची खरेदी सुरू केली आहे. केंद्र सरकारनं जूनपर्यंत देशात किती पीपीई किट, मास्क आणि व्हेटिंलेटर लागतील, याचा अंदाज घेऊन खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. हे साहित्य परदेशातून आयात करण्यात येणार असून, चीननं ६३ हजार पीपीई किट भारतात पाठवल्या आहेत. या किटची पाहणी केल्यानंतर त्या ठरवून दिलेल्या नियमांची पूर्तता न करताच पाठवण्यात आल्याचं आता समोर आलं आहे.

जूनपर्यंत लागणार दीड कोटी पीपीई, दोन कोटी ७० लाख मास्क

करोनासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनाचा आढावा घेतल्यानंतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या मूळ साधनांची गरज लागणार असल्याचं समोर आलं. या दिशेनं केंद्र सरकारनं काम करणं सुरू केलं आहे. जूनपर्यंत देशात दीड कोटी पीपीई (स्वसंरक्षण साहित्य. उदा. मास्क वगैरे), दोन कोटी ७० लाख एन९५ मास्क आणि ५०,००० व्हेटिंलेटर लागणार आहे. याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून परदेशातून या वस्तू मागवण्यात येणार आहे. यासंदर्भात नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांची उद्योग, स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थाच्या प्रतिनिधींसोबत ३ एप्रिल रोजी ही बैठक घेतली होती.