जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा संसर्ग देशात अद्यापही सुरूच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ६३ हजार ४८९ जण करोनाबाधित आढळले आहेत. तर ९४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची संख्या २५ लाख ८९ हजार ६८२ वर पोहचली आहे.

देशातील २५ लाख ८९ हजार ६८२ करोनाबाधितांमध्ये ६ लाख ७७ हजार ४४४ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले १८ लाख ६२ हजार २५८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेले ४९ हजार ९८० जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

तसेच, १५ ऑगस्टपर्यंत देशात एकूण २,९३,०९,७०३ नमूने तपासले गेले असून, यातील ७ लाख ४६ हजार ६०८ नमूने काल तपासल्या गेले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

काल १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करताना, करोनायोद्धय़ांना अभिवादन करत पंतप्रधान मोदींनी करोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणाचा मार्ग आराखडा तयार झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘आपल्या वैज्ञानिकांची प्रतिभा ऋषीमुनींसारखी आहे. ते प्रयोगशाळांमध्ये खूप मेहनत घेत आहेत. तीन लसी चाचण्यांच्या विविध टप्प्यांत आहेत. त्या समूह वापरासाठी योग्य असल्याचा निर्वाळा शास्त्रज्ञांनी दिल्यावर लगेचच त्यांचे व्यापक उत्पादन होईल. कमीत कमी वेळेत प्रत्येक नागरिकाला ही लस मिळेल. त्यासाठी सरकार सज्ज आहे.’’

तर, दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह काही देशांच्या आक्षेपानंतरही रशियानं आपल्या करोनाच्या लसीचं उत्पादन सुरू केलं आहे. गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीनद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘स्पुटनिक – व्ही’ या करोना विषाणूवरील लसीचं उत्पादन सुरू करण्यात आल्याचं रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पुढील वर्षभरात करोना विषाणूच्या लसीचे देशात ५० कोटी कोटींपेक्षा अधिक डोस तयार करण्यास सक्षम असल्याचं रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.