देशात टाळेबंदी लागू असलेल्या मे महिन्यात  ६४ लाख नागरिकांना, म्हणजेच देशातील बिगरअल्पवयीन ०.७३ टक्के लोकांना करोनाची लागण झाली होती, असा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) पहिल्या देशव्यापी सीरो सर्वेक्षणाच्या अहवालात नोंदविण्यात आला आहे.

हे सर्वेक्षण ११ मे ते ४ जून या काळात करण्यात आले. त्या अंतर्गत २१ राज्यांतील २८ हजार  जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. एकूण ६४ लाख ६८ हजार ३८८ नागरिक करोनाबाधित  झाले होते. हे सर्वेक्षण ग्रामीण भागांमध्ये अधिक केले गेल्यामुळे  या भागांमध्ये संसर्गाचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याचे नोंदले गेले आहे. बाधितांचे प्रमाण ग्रामीण भागांमध्ये ६९.४ टक्के, शहरी झोपडपट्टय़ांमध्ये १५.९ टक्के, शहरी उर्वरित भागांत १४.६ टक्के असे   होते. वयोमानाप्रमाणे १८ ते ४५ वयोगटात हे प्रमाण ४३.३ टक्के, ४६-६० वर्षे वयोगटात ३९.५ टक्के, तर ६० वर्षांवरील वयोगटात १७.२ टक्के होते. सर्वेक्षणातील अनुमानानुसार, आरटीपीसीआर चाचणीतून एक बाधित व्यक्ती सापडली तर ८२ ते १३० बाधित असलेल्या पण न सापडलेल्या व्यक्ती होत्या. करोनाची बाधा एक टक्क्यापेक्षा कमी लोकांना झाल्याचे आढळले आहे.  म्हणजेच देशातील प्रचंड  लोकसंख्येला करोनाची बाधा होण्याचा धोका असू शकतो.

२४ तासांत रुग्णवाढ व मृत्यूही सर्वाधिक

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात करोनाची दैनंदिन रुग्णवाढ व मृत्यूही सर्वाधिक नोंदवले गेले. गुरुवारी दिवसभरात ९६ हजार ५५१ नव्या रुग्णांची भर पडली, तर १२०९ रुग्णांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी ९५ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली असून ३ सप्टेंबरपासून रुग्णांची संख्या ८० हजारांमध्ये वाढली आहे.

महाराष्ट्रात रुग्णसंख्या दहा लाखांपार

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर १८६व्या दिवशी रुग्णसंख्येने दहा लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात राज्यात २४,८८६ नवे रुग्ण आढळले असून, आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. एकटय़ा पुणे जिल्ह्य़ात २४ तासात ५२०८ रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत १० लाख १५  हजार   रुग्ण आढळले असून, ७ लाख १५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. २८,७२४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ लाख ७१ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.