भारताच्या ६५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर आयोजित करण्यात आलेल्या संचलनाचे थेट प्रक्षेपण यंदा ‘यू टय़ूब’वर तसेच ‘हाय डेफिनिशन’ वाहिन्यांवरही करण्यात येणार आहे. दूरदर्शनतर्फे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. तसेच प्रथमच कर्णबधिर नागरिकांनाही सांकेतिक भाषेद्वारे या संचलनाचे धावते समालोचन डीडी न्यूज, डीडी भारती आणि डीडी उर्दू या वाहिन्यांवर उपलब्ध करून दिले जाणार आहे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे प्रक्षेपण आजवर दूरदर्शनतर्फे केवळ ‘स्टँडर्ड डेफिनिशन’ स्वरूपातच केले जात होते. मात्र यंदा संचलनाच्या प्रक्षेपणाच्या दर्जामध्ये प्रचंड सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी १०० कर्मचाऱ्यांचा विशेष ताफा तैनात करण्यात आला आहे. ‘इंडिया गेट’पासून राजघाटापर्यंत १८ उच्च क्षमतेचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.