गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळावा म्हणून भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग हे सध्या तेथे जाऊन किल्ला लढवीत असतानाच भारतातील ६५ संसद सदस्यांनी त्याविरोधात दंड थोपटले आहेत. मोदी यांना भविष्यातही व्हिसा नाकारावा, अशी विनंती त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना केली आहे. तशा आशयाचे पत्रही या सदस्यांनी ओबामा यांना पाठविले आहे.
१२ विविध पक्षांच्या खासदारांनी हे पत्र पाठविले असून त्यामध्ये राज्यसभेचे २५ तर लोकसभेच्या अन्य ४० खासदारांचा समावेश आहे. हे पत्र गेल्या ५ डिसेंबर रोजी पाठविण्यात आले असून त्या पत्राच्या प्रती पुन्हा गेल्या रविवारी ओबामा यांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आल्या. नरेंद्र मोदी यांना व्हिसा न देण्याचे तुमचे धोरण तसेच राबवावे, त्यामध्ये कसलाही बदल करू नये, अशी विनंती ओबामा यांना करण्यात आली आहे.
राजनाथ सिंग हे अमेरिकी सदस्यांना भेटण्यासाठी येथे आलेले असतानाच ‘इंडियन अमेरिकन मुस्लीम कौन्सिल’ने या पत्राच्या प्रती वितरित केल्या. मोदी यांच्या व्हिसावर घालण्यात आलेली बंदी उठवावी, असे आपण अमेरिकी नेत्यांना सुचविणार आहोत, असे राजनाथ सिंग यांनी म्हटले होते. राज्यसभेचे अपक्ष खासदार मोहम्मद अदीब यांनी मोदी यांना व्हिसा मिळू न देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ओबामा यांना पाठविण्यात आलेल्या या पत्रावर जनता दल (यु) चे अन्वर अन्सारी, काँग्रेसचे रशीद मासूद, तृणमूल काँग्रेसचे एस. अहमद, द्रमुकचे के.पी.रामलिंगम्, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एम.पी. अच्युतन यांनीही स्वाक्षऱ्या केल्या आहेत, असे सांगण्यात आले; परंतु येचुरी यांनी मात्र अशा कोणत्याही पत्रावर आपण सही केली असल्याचे नाकारले. अमेरिकी प्रशासनास अशा प्रकारचे पत्र लिहिणारी आपण शेवटची व्यक्ती असू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. देशाच्या अंतर्गत व्यवहारात कोणी हस्तक्षेप करावा, असे आपल्याला वाटत नाही. अशा मुद्दय़ांचे निराकरण देशातच राजकीय मार्गाने करायचे असते, असेही ते म्हणाले. अच्युतन यांनीही आपण अशा पत्रावर स्वाक्षरी केल्याचे नाकारले आहे.
दरम्यान, अदीब यांनी मात्र येचुरी आणि अच्युतन यांनी स्वाक्षऱ्या केल्याचे ठासून सांगितले आणि आता हे दोघे जण माघार घेत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.