प्राप्तिकर विभागाने दोन चित्रपट कंपन्या, दोन गुणवत्ता व्यवस्थापन कंपन्या आणि आघाडीच्या अभिनेत्रीच्या निवासस्थानावर छापे टाकून ६५० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता उघडकीस आणली असल्याचा दावा गुरुवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने केला. मात्र मंडळाकडून कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्यांचे भागीदार यांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानांवर छापे टाकण्यात आल्यानंतर मंडळाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. सेलिब्रिटींचे काम करणारे काही अधिकारी आणि केडब्ल्यूएएन आणि एक्सिड या गुणवत्ता व्यवस्थापन कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चित्रपट, वेब मालिका, अभिनय आणि दिग्दर्शन आणि गुणवत्ता व्यवस्थापन आणि अन्य कलाकारांशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकण्यात आल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कोणाचाही नामोल्लेख न करता सांगितले. तथापि, तापसी पन्नू, फॅण्टम फिल्म्सचे चार माजी प्रवर्तक कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि मधु मन्तेना यांच्यावर छापे टाकण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.