जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा संसर्ग देशात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल ६५ हजार २ जण करोनाबाधित आढळले आहेत. तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची संख्या २५ लाख २६ हजार १९३ वर पोहचली आहे.

देशातील २५ लाख २६ हजार १९३ करोनाबाधितांमध्ये ६ लाख ६८ हजार २२० अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले १८ लाख ८ हजार ९३७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेले ४९ हजार ३६ जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

तसेच, १४ ऑगस्टपर्यंत देशात एकूण २,८५,६३,०९५ नमूने तपासले गेले असून, यातील ८ लाख ६८ हजार ६७९ नमूने काल तपासल्या गेले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

“करोना व्हायरसवर लस कधी येणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आपले शास्त्रज्ञ करोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. भारतात करोनावर एक नाही तीन लसी विकसित करण्यात आल्या आहेत. त्या चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. करोना व्हायरसवरील लस प्रत्येकाला मिळाली पाहिजे, हे सरकार सुनिश्चित करेल” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते ७४ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत होते.

“करोना व्हायरसच्या लसीचे उत्पादन आणि वितरणाचा आराखडा ठरला आहे. कमीत कमी वेळेत करोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा आराखडा तयार आहे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “भारतात करोना व्हायरसच्या लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. उत्पादन, वितरणाचा सर्व आराखडा ठरला आहे. प्रत्येक भारतीयाला ही लस मिळेल हे सरकार सुनिश्चित करेल” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.