थिरुअनंतपूरम : करोनाच्या फैलावामुळे २५ मार्चपासून टाळेबंदी जारी करण्यात आल्यापासून केरळमध्ये आतापर्यंत जवळपास ६६ मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. शाळा बंद आणि भेडसावणाऱ्या समस्यांबाबत मित्रांकडे मन मोकळे करता येत नसल्याने तरुणवर्ग ताण सहन करू शकत नाही ही प्रामुख्याने आत्महत्येची कारणे आहेत.

भ्रमणध्वनीचा वापर केल्याबद्दल पालकांकडून काढण्यात येणारी खरडपट्टी आणि ऑनलाइन वर्गात गैरहजर राहणे यासह विविध कारणांस्तव लहान मुलांमध्ये आत्महत्या करण्याचा कल वाढत चालला आहे, असे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी म्हटले आहे.

त्यामुळे तणावग्रस्त मुलांसाठी दूरस्थ सल्लागार सुविधा सुरू करण्याबरोबरच पालकांनाही मुलांच्या भावना न दुखावण्याबाबत सावध करणे या उपाययोजना सरकारला हाती घ्याव्या लागल्या आहेत. या प्रश्नावर अभ्यास करण्याबाबतचे आदेशही देण्यात आले आहेत. टाळेबंदी जारी करण्यात आल्यापासून १८ वर्षांखालील ६६ मुलांनी विविध कारणांस्तव आत्महत्या केली आणि हा गंभीर सामाजिक प्रश्न आहे, असेही विजयन यांनी म्हटले आहे.