विमानतळावर तस्करी केले जाणारे सोने जप्त करण्याची जबाबदारी सीमाशुल्क विभागाची असते. पण याच विभागाने जप्त केलेल्या सोन्याची सध्या चोरी होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. गेल्या सात महिन्यात दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तब्बल ६७ किलो सोने ‘गहाळ’ झाले आहे. विभागातून सोने गहाळ होण्यामागे विभागातील काही अधिका-यांचा हात असल्याची चर्चा रंगली आहे.

विमानतळांवर होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमाशुल्क विभाग अर्थात कस्टमचे अधिकारी डोळ्यात तेल घालून काम करत असतात. गेल्या सात महिन्यात सीमा शुल्क विभागाने दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर सोने गहाळ झाल्याप्रकरणी ४७ तक्रारी दाखल केल्या आहेत.  गेल्या तीन वर्षातील हे प्रमाण सर्वाधिक होते. सात महिन्यात  कस्टमने जप्त केलेल्या सोन्यापैकी तब्बल ६७ किलोचे सोने गहाळ झाले आहे. एकीकडे केंद्र सरकार काळा पैसा आणि सोन्यावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न करत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळासोबतच तामिळनाडूतील त्रिची विमानतळावरही जप्त केलेले सोने गहाळ झाल्याचे समोर आल्याने देशभरात हे रॅकेट सक्रीय आहे की काय अशी शंका उपस्थित होत आहे. त्रिचीमध्ये तब्बल ३९ किलोचे सोने गहाळ झाल्याची माहिती कस्टम्समधील अधिका-यांनी दिली.

गेल्या तीन वर्षात देशभरातील प्रमुख विमानतळांवरुन १३० किलोचे सोने गहाळ झाल्याची माहिती आता समोर आली आहे. अखेर सीमाशुल्क विभागाच्या अधिका-यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.  विमानतळावर जप्त केलेले सोने हे सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात असते. याची वार्षिक तपासणीही केली जाते. या दरम्यान पकडले जाऊ नये यासाठी सोन्याचे बनावट दागिनेही आणून ठेवले जाते अशी माहिती सूत्रांनी दिली.

चालू वर्षाच्या सुरुवातीला सीमा शुल्क विभागातील अधिका-याने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती. सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात २९८ ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते. मात्र अज्ञात व्यक्तीने हे दागिने बदलून त्या जागी बनावट दागिने ठेवल्याची तक्रार अधिका-याने केली होती. तेव्हापासून सीमा शुल्क विभागातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला होता. हा प्रकार म्हणजे कुंपणच शेत खातंय असा असल्याचा आरोप केला जात आहे.