इराकची राजधानी बगदादमधील लोकप्रिय आणि शिया पंथीयांची गर्दी असलेल्या बाजारपेठेत सकाळी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात ६७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र, इसिस या दहशतवादी संघटनेवर आरोप करण्यात येत आहे. शिया पंथीयांवर हल्ले करण्याची इसिसची योजना असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, स्फोटकांनी भरलेल्या ट्रकचा सकाळी शहरातल्या बाजारपेठेत स्फोट झाला. या घटनेत १५२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. बगदादमधील हे खाद्यपदार्थ मिळण्याचे मुख्य केंद्र आहे.
भीषण घटनेनंतर स्थानिकांनी जखमींना मदत करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. सैनिकांनीही जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदतकार्य राबविले. बॉम्बस्फोटामुळे कपडय़ांच्या दुकानांना आग लागली. तसेच, घटनास्थळी बाजारातील विविध वस्तू अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आठवडय़ाचा अखेरचा दिवस असल्यामुळे या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. शीत वस्तूंच्या ट्रकमध्ये ही स्फोटके ठेवण्यात आल्यामुळे पोलिसांना स्फोटकांचा ट्रक ओळखता आला नाही.
मिनी बसचा चालक हसन हमीद म्हणाला की, बाजारपेठेकडे जात असताना झालेल्या स्फोटामुळे आमची बस १० मीटर मागे फेकली गेली. हा अतिशय तीव्र स्फोट होता. हमीदही या  हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो म्हणाला की, स्फोटानंतर काही वाहने हवेत फेकली गेल्याचेही मी पाहिले.