अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात एका वृद्ध शीख व्यक्तीवर दोन जणांनी क्रूरपणे हल्ला केला, हा द्वेषमूलक गुन्हा असून त्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. अमरिक सिंग बाल या व्यक्तीवर शनिवारी सकाळी कॅलिफोर्नियातील फ्रेसनो भागात हल्ला करण्यात आला, असे ‘फ्रेसनो बी’ या वृत्तपत्राच्या बातमीत म्हटले आहे. हा शीख ६८ वर्षांचा असून तो कामावर जाण्यासाठी वाहनाची वाट बघत असताना दोन श्वेतवर्णीयांनी त्यांची मोटार त्याच्या पुढे आणून थांबवली व अश्लील हावभाव सुरू केले.
जीवाला घाबरून हा शीख वृद्ध रस्ता ओलांडू पळू लागला असता संशयितांनी गाडीतून त्याचा पाठलाग केला व त्याला धडक दिली नंतर दोघे हल्लेखोर गाडीतून उतरले व त्याच्या तोंडावर गुद्दे मारले, एका हल्लेखोराने तू येथे का आलास असे विचारले. बाल या शीख वृद्धास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचे गळ्याचे हाड मोडले आहे. पोलिस अधिकारी नोल यांनी सांगितले, की वंशद्वेषमूलक स्वरूपाचा हा गुन्हा असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. फ्रेसनो पोलिसांनी याबाबत अंतर्गत गृहमंत्रालय व एफबीआयला तपासात सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. अमेरिकेतील शिखांविरोधातील अलिकडच्या गुन्ह्य़ातील हा एक आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कॅलिफोर्नियात गुरुद्वारावर द्वेषमूलक लिखाण करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये शीख अमेरिकी व्यक्तीवर शिकागो येथे बिन लादेन असे संबोधून हल्ला करण्यात आला होता. २०१४ मध्ये संदीप सिंग या अमेरिकी व्यक्तीला न्यूयॉर्क शहरात ३० फूट फरफटत नेऊन अतिरेकी संबोधण्यात आले होते. मे २०१३ मध्ये ८२ वर्षांचे पियारा सिंग यांच्यावर नानकसर शीख मंदिरानजीक दक्षिण फ्रेसनो येथे मुस्लीम समजून हल्ला करण्यात आला होता. २०१२ मध्ये शीख गुरुद्वारात ओक क्रीक या विस्कॉनसिनमधील भागात हल्ला करून सहा निरपराध शिखांना ठार करण्यात आले होते. मध्य कॅलिफोर्निया शीख मंडळाचे सदस्य इके इक्बाल ग्रेवाल यांनी सांगितले, की शिखांवर मुस्लीम समजून हल्ले करण्याचे प्रकार ९/११ च्या घटनेनंतर वाढले आहेत.