पंजाब प्रांताची राजधानी असलेल्या लाहोर शहरात एका लोकप्रिय उद्यानात आत्मघातकी बाँबरने स्वत:ला उडवून दिल्याने झालेल्या भीषण स्फोटात ६९ जण ठार तर ३०० हून अधिक जखमी झाले.
रविवारी ईस्टरच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी फार मोठय़ा संख्येत लोक इक्बाल टाऊन भागातील गुलशन-ए-इक्बाल पार्कमध्ये जमले असताना झालेल्या या जबरदस्त स्फोटामुळे सर्वत्र रक्ताचा सडा पसरला. एका आत्मघातकी बाँबरने उद्यानाच्या मुख्य द्वाराजवळ स्वत:ला उडवून दिल्याची शंका असल्याचे लाहोरचे पोलीस उपमहानिरीक्षक हैदर अशरफ यांनी सांगितले. या स्फोटासाठी सुमारे१० ते १५ किलोग्रॅम स्फोटके वापरण्यात आली असावी असा अंदाजत्यांनी व्यक्त केला.
स्फोटात किमान ६९ जण ठार झाल्याचे जिल्हा समन्वयन अधिकारी मोहम्मद उस्मान यांनी सांगितले, तथापि ख्रिश्चन समुदाय हल्ल्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी नाकारले. या हल्ल्यात तीनशेहून अधिक लोक जखमी झाल्याचा अंदाज असून, त्यांपैकी बरेच जण गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते असे पंजाबचे मंत्री बिलाल यासिन म्हणाले. अंदाजे २० वर्षांच्या आत्मघातकी बाँबरने उद्यानात प्रवेश मिळवला आणि झोपाळ्याजवळ स्वत:ला उडवून दिले असे पंजाब पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले.