नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरात तब्बल ३ लाख ९२ हजार ७८ बालकांचा जन्म झाल्याची माहिती समोर आली आहे. बालकांसाठी कार्यरत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ या संस्थेनं याबाबत माहिती दिली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक म्हणजेच ६७ हजार ३८५ बालकांचा जन्म झाला. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन असून चीनमध्ये ४६ हजार २९९ बालकांचा जन्म झाला.

युनिसेफनं सादर केलेल्या आकड्यांनुसार तिसऱ्या क्रमांकावर नायजेरिया असून त्या ठिकाणी १ जानेवारी रोजी २६ हजार ३९ बालकांचा जन्म झाला. त्यानंतर पाकिस्तान (१६,७८७), इंडोनेशिया (१३,०२०), अमेरिका (१०,४५२), कांगो (१०,२४७), इथिओपिया (८,४९३) आणि पाकिस्तान (६,७८७) या देशांचा क्रमांक येतो.

दरम्यान, जन्माचा पहिला दिवस आई आणि बाळासाठई खडतर असतो. तर ४० टक्के बालकांचा मृत्यू हा त्यांच्या जन्माच्या दिवशीच होतो, असं युनिसेफकडून सांगण्यात आलं. जगभरात जन्माला येणाऱ्या बालकांबाबत युनिसेफनं काही तथ्य मांडली आहेत. २०१८ मध्ये जन्मलेल्या २५ लाख बालकांनी जन्माच्या पहिल्याच महिन्यात आपले प्राण गमावले होते. तर त्यातील एक तृतीयांश बालकांचा मृत्यू त्यांच्या जन्मदिनीच झाला होता. बालकांच्या जन्मादरम्यान होणारे कॉम्लिकेशन्स आणि आजारांमुळे बालकांचा मृत्यू झाल्याचं युनिसेफकडून सांगण्यात आलं. तसंच हे थांबवण्यासाठी सध्या युनिसेफदेखील प्रयत्नशील आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये हा आकडा कमी होत आहे. पात वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या मृत्यूदरातही घट झाली आहे. २०१८ मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या मृत्यूचं प्रमाण ४७ टक्के होतं. अनेकदा मातांच्या आणि नवजात बालकांच्या देखरेखीसाठई प्रशिक्षित नर्स देण्यात येत नाहीत. त्याचाच विपरित परिणाम आपल्याला होताना दिसतो, असं मत युनिसेफच्या कार्यकारी संचालिका हेनरिएटा फोर यांनी व्यक्त केलं.