भारतात रोजगार निर्मितीसाठी ७.५ टक्क्यांची विकासदार पुरेसा नाही, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. भारताने पुढील १० ते २० वर्षांचा विचार केला पाहिजे. अधिक रोजगार निर्मितीसाठी अधिक जोर लावावा लागेल. आर्थिक क्षेत्रातील सुधारणांना वेग दिल्यास भारत लवकरच १० टक्क्यांचा विकासदर गाठू शकतो, असा सल्लाही त्यांनी दिला.

शिकागो विद्यापीठातील बूथ ऑफ बिझनेस स्कूलचे प्रोफेसर राजन हे हाँगकाँगमध्ये आयोजित एका परिषदेत बोलत होते. भारतात पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. कंपन्यांसाठी मार्ग तयार केला जात आहे. व्यवसाय सुलभ बनवणे तसेच आरोग्य आणि शिक्षणाबरोबरच मनुष्यबळाच्या गुणवत्तेत सुधारणा केल्यास १० टक्के विकासदर भारताला गाठता येईल. यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्याची गरज आहे. जर आम्ही हे करू शकलो तर मला वाटतं की आम्ही निश्चितपणे ७.५ टक्क्यांपेक्षा पुढे जाऊ. कारण प्रत्येकवर्षी १.२ कोटी लोकांना रोजगार देण्यासाठी हा विकासदर पुरेसा नाही. आम्ही दहापेक्षाही पुढे जाऊ शकतो. आम्ही असं करू शकतो, पण आम्हाला यावर काम करावं लागेल.

सुधारणांविषयी राजन म्हणाले की, सुधारणा होत आहेत. पण त्याची गती कमी आहे. राजकीय सहमती होत नसल्यामुळे, असे होत असेल. पण आम्हाला यावर वेगाने काम करण्याची गरज आहे. कारण आमच्याकडे युवकांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे आणि जगही बदलत आहे. जर भारतात एका रात्रीतून मोठा निर्यातदार झाला तर त्यांचे उत्पादन कोण खरेदी करणार. त्यामुळे आम्हाला आमच्या विकासदराबाबत विचार करायला हवा. ते चीनपेक्षाही वेगळे असेल. पण हा एक मजबूत रस्ता असेल, असेही ते म्हणाले.

भारत कधीपर्यंत १० टक्के विकासदर गाठू शकतो, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, हे पुढील निवडणुकीनंतरच शक्य होईल. कारण आता सर्व सुधारणा थांबवण्यात येतील. मला वाटतं, येत्या निवडणुकीपर्यंत सर्व सुधारणा एका कपाटात बंद ठेवण्यात येतील. पण निवडणुकीनंतर जर सुधारणांना गती दिली तर दोन ते तीन वर्षांत विकासाचा दर वाढेल. भारतात भूमी अधिग्रहण आणि ऊर्जा क्षेत्रात सुधाराची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.