चीनने अर्थसंकल्पात संरक्षणातील तरतूद ७.५ टक्क्य़ांनी वाढवली आहे. आशिया-पॅसिफिक भागाचे लष्करीकरण झाले असून दक्षिण चीन सागरात तणाव वाढला आहे तसेच चीन व अमेरिकेचे संबंध बिघडलेले आहेत, अशा परिस्थितीत चीनने संरक्षण वाढवला असून तो १४६ अब्ज अमेरिकी डॉलर्स करण्यात आला आहे.

आर्थिक मंदीमुळे चीनने सहा वर्षांत प्रथमच संरक्षण खर्चात कमी वाढ केली आहे. चीनचा विकास दर गेल्या वर्षी सव्वीस वर्षांतील नीचांकी म्हणजे ६.९ टक्के होता. चीनच्या संरक्षण तरतुदीतील वाढीचे समर्थन करताना नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या प्रवक्तया फू यिंग यांनी असा आरोप केला, की अमेरिकेने आशिया-पॅसिफिक भागाचे लष्करीकरण केले असून दक्षिण आशिया सागरात वाद सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव कायम आहे. काही लोकांच्या मते चीनच्या संरक्षण खर्चातील वाढीचा संबंध दक्षिण चीन सागरातील लष्करीकरणाशी संबंधित आहे.दक्षिण चीन सागर हा साधनसामग्रीने संपन्न असून त्यावर चीनने दावा सांगितला आहे. त्याला फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई व तैवानचा विरोध आहे. ऑक्टोबरमध्ये यूएसएस लासेन या अमेरिकेच्या क्षेपणास्त्र विनाशिकेने चीनने स्पार्टली बेटांच्या परिसरात बांधलेल्या कृत्रिम बेटांपासून १२ नाविक मैल अंतराच्या परिसरात प्रवेश केला होता. चीनने त्याचा तीव्र निषेध करताना अमेरिकेने चीनच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. संरक्षण खर्चातील ही वाढ गेल्या वर्षीच्या १०.१ टक्के इतक्या वाढीपेक्षा कमी असली तरी भारत व चीन यांच्या संरक्षण खर्चात ४० अब्ज डॉलर्सचा फरक आहे.