X

कर्नाटकात भाजपात फूट?, काही आमदार संपर्कात असल्याचा काँग्रेसचा दावा

गरज पडल्यास काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये ते सहभागी होऊ शकतात. पण आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. कारण हे चुकीचे आहे

कर्नाटकमध्ये सत्तेतील भागीदार काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा भाजपावर आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. भाजपा पुन्हा एकदा आमच्या आमदारांना पैशांचे अमिष दाखवत आहे. पण भाजपाचा हा डाव यशस्वी होणार नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी बुधवारी म्हटले. त्याचबरोबर भाजपाचेच ७ ते ८ आमदार आमच्या संपर्कात असून गरज पडल्यास तेच बंडखोरी करू शकतात, असा दावाही गुंडुराव यांनी केला आहे.

भाजपाचे लोक विचार करत आहेत की, पैशांचे अमिष दाखवून काँग्रेसच्या आमदारांना तोडता येईल. पण अशा लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, भाजपाचेच ७ ते ८ आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि गरज पडल्यास काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये ते सहभागी होऊ शकतात. पण आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. कारण हे चुकीचे आहे, असे गुंडुराव म्हणाले.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही काँग्रेसने भाजपावर आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी पक्षाने निवेदन जारी करून हा आरोप केला होता. या आरोपानंतरही भाजपाने राज्यात बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. परंतु, विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-जेडीएसचे सरकार सत्तेवर आले होते.