पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या तुफान धुमश्चक्रीत तालिबान आणि लष्कर-ए-जांगवीचे किमान सात दहशतवादी ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले.
लाहोरनजीकच्या शरकपूर येथे १२ दहशतवाद्यांच्या एका टोळक्याने घुसण्याचा प्रयत्न केला असता ही चकमक उडाली.
पोलिसांना पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. तेव्हा प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सात दहशतवादी ठार झाले.
अन्य दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, असे पोलिसांनी सांगितले.
या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी दोन किलो स्फोटके जप्त केली. ठार झालेले दहशतवादी तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान आणि शियाविरोधी लष्कर-ए-जांगवी गटाचे होते.