News Flash

संघर्षग्रस्त देशात वार्ताकन करताना वर्षभरात ७० पत्रकारांचा मृत्यू

यंदाच्या वर्षी जगात ठिकठिकाणी आपले वार्ताकनाचे कर्तव्य बजावत असताना किमान ७० पत्रकारांनी प्राण गमावले.

| December 31, 2013 12:35 pm

यंदाच्या वर्षी जगात ठिकठिकाणी आपले वार्ताकनाचे कर्तव्य बजावत असताना किमान ७० पत्रकारांनी प्राण गमावले. त्यात २९ पत्रकार हे सीरियातील यादवी युद्धाचे वार्ताकन करताना मारले गेले, तर १० जण इराकमधील संघर्षांत मारले गेले असे पत्रकार संरक्षण समितीने म्हटले आहे.
सीरियातील मृतांमध्ये अनेक नागरी पत्रकारांचा समावेश असून ते त्यांच्या शहरांमध्ये बसून तेथील परिस्थितीचे वार्ताकन करीत होते. काही दूरचित्रवाणी पत्रकारांचाही त्यात समावेश आहे. यात सरकारच्या बाजूने व विरोधात बातम्या देणाऱ्या पत्रकारांचा समावेश आहे. अल् जझिराचे प्रतिनिधी महंमद अल् मेसालमा यांचा गोळीबारात मृत्यू झाला.
इजिप्तमध्ये १४ ऑगस्टला अध्यक्ष महंमद मोर्सी यांच्या विरोधात जी मोठी निदर्शने झाली त्या वेळी सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत सहा पत्रकार मारले गेले, त्यातील निम्मे वार्ताहर होते.
समितीचे उपसंचालक रॉबर्ट महोनी यांनी सांगितले, की मध्य पूर्वेकडील देश पत्रकारांसाठी मृत्युभूमी ठरली. सीरियातील यादवी युद्ध तसेच इराकमधील वेगवेगळय़ा पंथातील हिंसाचारात काही पत्रकारांचा बळी गेला. आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रथम वेगवेगळय़ा देशांतील सरकारे व सशस्त्र गट यांना पत्रकारांचा नागरी पत्रकार म्हणून दर्जा मान्य करायला भाग पाडावे तसेच मारेकऱ्यांवर खटले भरण्यात यावेत.
न्यूयॉर्कमधील पत्रकार संरक्षण समितीने १९९२ पासून वेगवेगळय़ा संघर्षांना तोंड देत बातमीदारी करणाऱ्या पत्रकारांनी जे बलिदान दिले त्याची नोंद घेतली आहे. जिथे ते राहात होते तिथूनच ते नागरी पत्रकार म्हणून बातमीदारी करीत होते. काही देशांत संवेदनशील विषयावर वार्ताकन केले म्हणूनही पत्रकारांना ठार करण्यात आले आहे असे समितीने म्हटले आहे.
 पोलिसांचे गैरवर्तन, अमली पदार्थ व्यापार यांसारख्या विषयावर लिहिणाऱ्या पत्रकारांना ब्राझील, कोलंबिया, फिलिपीन्स, भारत, बांगलादेश, पाकिस्तान व रशियात मृत्यूला सामोरे जावे लागले. रेडिओ फ्रान्सच्या दोन पत्रकारांचे अपहरण करून नंतर त्यांची माली येथे हत्या करण्यात आली. इराकमधील अतिरेक्यांनी सलाहेदिन टीव्हीच्या पाच कर्मचाऱ्यांना ठार केले, इराकमधील तिक्रित येथे या वाहिनीच्या कार्यालयावर झालेला तो आत्मघाती हल्ला होता. गेल्या दोन दशकांत प्रथमच मेक्सिकोत कुठल्याही पत्रकाराला ठार करण्यात आल्याची घटना घडली नाही. या वर्षांत ७० वगळता आणखी २५ पत्रकारांना ठार करण्यात आले असून, त्याबाबत समिती शहानिशा करीत आहे. सीरियातील संघर्षांत आजपर्यंत ६३ पत्रकारांचा वार्ताकन करताना मृत्यू झाला. एका वर्षांत साठ पत्रकारांचे सीरियात अपहरण झाले, तर तीस जण बेपत्ता आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2013 12:35 pm

Web Title: 70 journalists died on the job in 2013 report
टॅग : Journalists
Next Stories
1 जगातील पहिला त्रिमिती चॉकलेट प्रिंटर
2 वीरभद्र सिंह भ्रष्टाचारी; अरूण जेटलींचा आरोप
3 पश्चिम घाट संवर्धन कार्यक्रम राबविताना शेतक ऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही – अँटनी
Just Now!
X