नवी दिल्ली : देशात शुक्रवारी करोनाचे २३,०६७ नवे रुग्ण सापडले असून एकूण ९७ लाख लोक बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सहव्याधींमुळे झालेले मृत्यू सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

मृतांची संख्या ३३६ ने वाढून १ लाख ४७ हजार ९२ झाली आहे. सकाळी आठच्या आकडेवारीनुसार सत्तर टक्के मृत्यू हे सहआजारांमुळे झालेले आहेत.

करोनातून या काळात बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७ लाख १७ हजार ८३४ झाले आहे. त्यामुळे बरे होण्याचा राष्ट्रीय दर आता ९५.७७ टक्के झाला आहे. मृत्युदर १.४५ टक्के आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता लागोपाठ चौथ्या दिवशी तीन लाखांखाली गेली असून ती २ लाख ८१ हजार ९१९ आहे. देशात एकूण संसर्ग दरात हे प्रमाण २.७८ टक्के आहे. भारतात करोना रुग्णांची संख्या ७ ऑगस्टला वीस लाखांवर, ३० ऑगस्टला तीस लाखांवर तर १६ सप्टेंबरला ५० लाखांवर गेली होती. १९ डिसेंबरला संख्या १ कोटींवर गेली. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या माहितीनुसार कोविड १९ च्या १६ कोटी ६३ लाख ५ हजार ७६२ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या असून गुरुवारी एका दिवसात ९ लाख ९७ हजार ३९६ चाचण्या करण्यात आल्या. आणखी एकूण ३३६ मृत्यू झाले आहेत.

अमेरिकेत ब्रिटिश प्रवाशांवर निर्बंध

अ‍ॅटलांटा : अमेरिकेत आता ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांकडे कोविड १९ चाचणी नकारार्थी आल्याचे प्रमाणपत्र असणे सक्तीचे करण्यात आले आहे. ब्रिटनमधील नव्या करोना विषाणूमुळे आता अमेरिकेतही ब्रिटनवर प्रवास निर्बंध लागू करण्यात आले आहेत.