दोन दिवसांपूर्वी लबनॉनमधील बैरुत येथे साठवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटचा मोठा स्फोट झाला होता. त्यामध्ये जवळपास १३५ जणांचा मृत्यू तर ४ हजारांपेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्या ठिकाणी दोन आठवड्यांची आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. परंतु आता भारतातही साठवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेवरून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चेन्नईच्या बाहेरील परिसरात तब्बल ७०० टन अमोनियम नायट्रेट साठवण्यात आलं आहे. यावरून अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. २०१५ मध्ये अमोनियम नायट्रेटचा हा साठा चेन्नई बंदरावर जप्त करण्यात आला होता आणि तेव्हापासून तो याच ठिकाणी पडून असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

“२०१५मॉध्ये तामिळनाडूच्या एका आयातदाराकडून १.८० कोटी रूपयांचं रसायन जप्त करण्यात आलं होतं. दक्षिण कोरियामधून आयात करण्यात आलेला माल सुरक्षित आहे आणि तो काढण्यासाठी ई-लिलाव प्रक्रिया सुरू आहे,” अशी माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

दरम्यान, सीबीआयसीने सीमाशुल्क आणि त्या ठिकाणच्या प्रशासनाला त्वरित पडताळणी करण्यास सांगितलं आहे. देशभरातील गोदामांमध्ये व बंदरांमध्ये कोणतीही धोकादायक व स्फोटक सामग्री सर्व सुरक्षा आणि अग्निशामक मापदंडांची पूर्तता करत असल्याची ४८ तासात पडताळणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसंच मानवी जीवन आणि संपत्तीलाही धोका नसल्याची पडताळणी करण्यास सांगण्यात आलं आहे.

“अमोनियम नायट्रेटमुळे चेन्नईच्या गोदामातही बैरुतसारख्या स्फोट होण्याचा धोका आहे. हे रोखण्यासाठी चेन्नईच्या गोदामातील अमोनियम नायट्रेट सुरक्षितपणे ठिकाणाहून हटवणं आवश्यक आहे. तसंच त्याचा आवश्यक त्या ठिकाणी योग्य वापर केला गेला पाहिजे,” असं मत पीएमकेचे प्रमुख डॉ. रामदास यांनी म्हटलं.