पाकिस्तानातील न्यायालयाने २००७ पासून निर्दोष मुक्तता केलेल्या जवळपास २००० संशयित दहशतवाद्यांपैकी बहुसंख्य दहशतवाद्यांनी पुन्हा दहशतवादी गटांमध्ये प्रवेश केला आहे अथवा ते देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत, असे प्रसारमाध्यमातील एका वृत्ताद्वारे स्पष्ट झाले आहे.
न्यायालयाने सुटका केलेल्या १९६४ संशयित दहशतवाद्यांपैकी ७२२ दहशतवाद्यांनी दहशतवादी गटांशी पुन्हा हातमिळवणी केली आहे, तर १९१७ दहशतवादी देशविरोधी कारवाया करीत आहेत, असे ‘डॉन’ने म्हटले आहे. निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी १२ जण ठार झाले असून त्यांपैकी चार जण अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाले आहेत, तर आठ जण सुरक्षारक्षकांनी केलेल्या कारवाईत ठार झाले आहेत.
जे संशयित दहशतवादी अद्याप जिवंत आहेत त्यांच्यावर पाळत ठेवली जात असून ते दहशतवादी कारवायांमध्ये अद्यापही सहभागी असल्याचे अहवालात म्हटले आहे. निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी ३३ जणांना पुन्हा अटक करण्यात आली असून ते सध्या कारागृहात आहेत. काही महत्त्वाच्या गुन्ह्य़ांमधील दहशतवाद्यांवर गुप्तचर यंत्रणांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे संरक्षणविषयक विश्लेषक शहझाद चौधरी यांनी म्हटले आहे.
एकदा निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याला पुन्हा पकडण्याची कायद्यात तरतूद नसल्याने काही वेळा संशयितांना बेपत्ता व्यक्ती म्हणून गणले जाते. निर्दोष मुक्तता करण्यात आलेले दहशतवादी पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. मात्र यामुळे न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केलेल्या दहशतवाद्यांवर पोलीसांची नजर राहील.