नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांकडून पैसे उकळणाऱ्या ७३ हजारांहून अधिक तृतीयपंथींना गेल्या चार वर्षांत अटक करण्यात आली असून दरदिवशी ५० तृतीयपंथी असे सरासरी प्रमाण आहे, असे रेल्वे प्रशासनाने माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

तृतीयपंथी नेहमीच रेल्वेच्या डब्यामध्ये घुसतात आणि प्रवाशांकडून पैसे उकळतात अशा वाढत्या तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. पैसे देण्यास नकार देणाऱ्या काही प्रवाशांवर या तृतीयपंथीयांकडून हल्लेही झाले आहेत, तर काहींना शिवीगाळ सहन करावी लागली आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून सातत्याने विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. जवळपास ७३ हजार ८३७ तृतीयपंथीयांना २०१५ पासून जानेवारी २०१९पर्यंत अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

रेल्वेमध्ये पोलिसांमार्फत घालण्यात येणारी गस्त हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. गुन्ह्य़ाला आळा गालणे, गुन्हा नोंदविणे, त्यांचा तपास करणे आणि रेल्वेच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही राज्य सरकारची जबाबदारी असून ती जबाबदारी शासकीय रेल्वे पोलिसांमार्फत पार पाडण्यात येते. रेल्वे प्रवाशांकडून तृतीयपंथीयांविरुद्ध अनेक तक्रारी येत असतात.