जगभरात आज (२१ जून) योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, याला गालबोट लागले असून उत्तर प्रदेशात एका वृद्ध महिलेचा योग प्रात्यक्षिके करताना दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, आजच्या जागतिक योग दिनानिमित्त डेहराडून येथे योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक लहान मुलांपासून ज्येष्ठांनी भाग घेतला होता. दरम्यान, योग प्रात्यक्षिके करताना एका ७३ वर्षीय वृद्ध महिलेला अचानक त्रास सुरु झाला. त्यामुळे तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डेहाडूनचे पोलिस अधीक्षक प्रदीप राय यांनी ही माहिती दिली.

राय म्हणाले, ज्या ठिकाणी या योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून मेडिकल कॅम्प लावण्यात आला होता. तसेच रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे संबंधित महिलेला त्रास होऊ लागताच तातडीने घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान तिने आपले प्राण सोडले. मात्र, या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. तिच्यावर उपचार करणाऱे डॉक्टरच या मृत्यू मागील निश्चित कारण सांगू शकतील.