देशाचा आज ७४ वा स्वातंत्र्यदिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत आहेत. करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार?, कुठली घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळया कार्यक्रमांची घोषणा केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे
– पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
– करोनाने सगळयांना रोखलं आहे. करोनाच्या कालखंडात करोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो.
– १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू

– आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. सतत देशवासियांच्या सुरक्षेमध्ये असणाऱ्या लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.

– आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहे.

– देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार ? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये योगदान द्यायचे आहे.

– कृषिक्षेत्रात भारत आत्मनिर्भर आहे. फक्त देशाचीच नव्हे तर अन्य देशांना सुद्धा कृषिमालाचा पुरवठा करु शकतो.

– एक काळ होता आपल्या देशात ज्या वस्तुंची निर्मिती व्हायची, त्याचे जगभरात कौतुक व्हायचे. आत्मनिर्भर म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर भारतात बनवलेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे.

– वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठया प्रमाणावर होणाऱ्या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणाऱ्या FDI गुंतवणूकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. करोना संकटकाळातही भारतात मोठया प्रमाणावर FDI गुंतवणूक झाली आहे.

– मेक इन इंडियाच्या बरोबरीने आता मेक फॉर वर्ल्डसाठी उत्पादने बनवायची आहेत.

– विकास यात्रेत मागे राहिलेल्या देशातील ११० जिल्ह्यांना पुढे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.

– शेतकऱ्यांना बंधनातून मुक्त केले. माझ्या देशातील शेतकरी उत्पादन केल्यानंतर त्याल हवं तिथे तो विकू शकत नव्हता. आम्ही त्याला बंधनातून मुक्त केले. आता तो त्याला हव तिथे, त्याच्या अटीनुसार पिकवलेला कृषीमाल विकू शकतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

– सात कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिला. ८० कोटी पेक्षा जास्त लोकांना मोफत अन्न दिले. ९० हजार कोटी थेट बँक खात्यात जमा केले.

– ‘जल जीवन मिशन’तंर्गत दोन कोटी पेक्षा जास्त कुटुंबांना स्वच्छ पाणी उपलब्ध करुन दिले.

– ‘इज ऑफ लिव्हिंग’चा मध्यमवर्गाला सर्वाधिक फायद झाला आहे. स्वस्त इंटरनेट ते इकोनॉमिकल हवाई तिकीट, हायवे ते आय वे, परवडणाऱ्या दरातील घरे ते कर कपात या सर्व उपायोजनांचा मध्यवर्गाला फायदा होणार आहे.

– करोना आला तेव्हा सुरुवातीला फक्त ३०० चाचण्या व्हायच्या पण आता दिवसाला सात लाख टेस्ट होतात.

– आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिला जाईल. तुमची प्रत्येक चाचणी, आजार याची माहिती त्या आयडीमध्ये असेल.

– देशातील शास्त्रज्ञ करोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. भारतातील तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. वैज्ञानिकांनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतर मोठया प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरु होईल. कमीत कमी वेळेत करोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा आराखडा तयार आहे.

– दीड लाख पंचायतींमध्ये ‘ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचले आहे. वेळेबरोबर प्राधान्यक्रम बदलला आहे. पुढच्या १ हजार दिवसात सहा लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

– LOC पासून LAC पर्यंत ज्यांनी देशात्या संप्रुभतेला  धोका निर्माण केला, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. भारताच्या संप्रभुतेच्या रक्षणासाठी संपूर्ण देश संकल्पित आहे. दहशतवाद किंवा विस्तारवाद असो, भारत ठामपणे मुकाबला करत आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या संबोधित मिशन गगयान तसेच गेल्यावर्षी तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वयासाठी सीडीएस पदाच्या निर्मितीची घोषणा केली होती. या पदाची आता निर्मिती सुद्धा झाली आहे.

करोना व्हायरसचे संकट, लॉकडाउनमुळे मंदावलेली अर्थव्यवस्थेची गती आणि पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या घुसखोरीमुळे निर्माण झालेला तणाव या मुद्यांवर पंतप्रधान काय भूमिका मांडतात, ते महत्त्वाचे ठरणार आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन थोडा वेगळा असणार आहे. करोना व्हायरसच्या संकटामुळे VVIP पाहुण्यांची संख्या थोडी कमी करण्यात आली आहे तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करुन यंदा आसनव्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.