भारतात अत्तापर्यंत विक्री झालेले तीन-चतुर्थांश एलईडी बल्ब हे सरकारच्या ग्राहक सुरक्षा मानकांच्या अनुरुप नसल्याचा दावा ‘नेल्सन’ या संशोधन करणाऱ्या कंपनीने केला आहे. कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. भारतात एलईडी बल्बचा १ बिलियन अमेरिकन डॉलर इतका मोठा व्यवसाय आहे.

मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद आणि नवी दिल्ली यांसारख्या महत्वाच्या शहरांमधील सुमारे २०० इलेक्ट्रिकल रिटेल आऊटलेट्सच्या जुलैमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या एलईडी बल्बपैकी बरीच उत्पादने ही बनावट आणि धोकादायक असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. याचे सर्वाधिक प्रमाण हे राजधानी दिल्लीत आहे.

या बनावट आणि नॉन-ब्रॅन्डेड एलईडी बल्बच्या उत्पादनांचा गंभीर परिणाम संघटित बाजारपेठेवर होत आहे. तसेच सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानावरही त्याचा विपरित परिणाम होणार असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

दरम्यान, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने ऑगस्ट महिन्यांत एलईडी बल्ब निर्मात्यांना त्यांची उत्पादने बीआयएस सोबत नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. याद्वारे चिनी एलईडी बल्ब उत्पादनांची तस्करी रोखण्यासही मदत होईल, असे सांगण्यात आले होते.

ग्राहकोपयोगी आणि भांडवली उत्पादनांच्या गुणवत्ता अधिक कडक केल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, बनावट एलईडी उत्पादनांमुळे सरकारच्या महसूलावरही परिणाम होत आहे. यापैकी ४८ टक्के एलईडी बल्बच्या ब्रँडसवर उत्पादकाचा पत्ता छापलेला नसतो तर ३१ टक्के बल्बवर उत्पादकाचे नावही छापलेले नसते, या बाबीही या सर्वेक्षणातून समोर आल्या आहेत.