अनेक देशांमधील कठोर कायद्यांमुळे स्थानिक तुरुंग प्रशासन कैद्यांशी संबंधित माहिती देत नाहीत. मात्र, मिळालेल्या सरकारी आकडेवारीनुसार विविध देशांतील ८६ तुरुंगांमध्ये जवळपास ७, ६२० भारतीय नागरिक कैद आहेत. त्यात किमान ५० महिलांचा समावेश आहे. त्यातील काही महिला श्रीलंका, चीन, नेपाळ आणि आखाती देशांमधील तुरुंगांमध्ये आहेत, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी दिली.

विदेशी तुरुंगांमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसंदर्भातील प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री अकबर यांनी ही माहिती दिली. विदेशी तुरुंगांमध्ये कैद असलेल्या एकूण भारतीय नागरिकांपैकी ५६ टक्के नागरिक आखाती देशांत आहेत. त्यात सर्वाधिक २,०८४ नागरिक हे सौदी अरेबियात कैद आहेत. त्यांच्यावर लाच, चोरी आणि फसवणुकीचे आरोप आहेत. तसंच काही तर मद्यपान केल्याप्रकरणी तेथील तुरुंगांमध्ये आहेत. सौदी अरेबियात मद्यपान करणं आणि विक्री करणं गुन्हा आहे. त्यामुळं या प्रकरणांमध्ये अनेकांना तुरुंगांत टाकलं आहे. थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये भारतीय नागरिकांना अंमली पदार्थ आणि मानवी तस्करीसह व्हिसासंबंधी प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेमध्येही अनेक भारतीय नागरिक कैद आहेत. मच्छिमारांची संख्या सर्वाधिक आहे. तर तामिळनाडूतील काही नागरिक बांगलादेश, भूतान आणि ब्रुनेईच्या तुरुंगांमध्ये कैद आहेत. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये ११५ कैदी आहेत. युरोपीय देश तेथील तुरुंगांमध्ये असलेल्या भारतीय कैद्यांची माहिती देत नाहीत, अशी माहितीही सरकारने दिली.