मध्य प्रदेशच्या इंदूर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये एका ७८ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केल्याचं समजतंय. बुधवारी(दि.१३) सकाळी ही घटना घडली.

सत्यपाल आहुजा असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आहुजा यांना न्युमोनिया झाला होता पण त्यांना करोनाची लागण झाली नव्हती. त्यांची करोनाची टेस्ट निगेटिव्ह आली होती. १९ दिवसांपासून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

“आत्महत्या केलेल्या व्यक्तीला रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या बेडजवळ असलेल्या खिडकीतून उडी मारली. घटनेनंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले पण त्यांचा मृत्यू झाला. जास्त वय असल्यामुळे ते उपचारांना उशीरा प्रतिसाद देत होते, त्यामुळे कदाचित नैराश्येतून त्यांनी हे पाऊल उचललं असावं”, असं महाराजा तुकडोजी होळकर(MTH) रुग्णालयाचे प्रभारी डॉ. सुमित शुक्ला यांनी सांगितलं. त्यांच्या वॉर्डमध्ये अन्य दोन ते तीन रुग्णही होते. त्यांनाही करोनाची लागण झालेली नसल्याचं शुक्ला यांनी पुढे नमूद केलं. तर, सेंट्रल कोतवाली पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे.