गेल्या काही वर्षांमध्ये भारतात स्त्री-भृणहत्येसारख्या प्रकारांना बऱ्याच प्रमाणात आळा बसला आहे. याशिवाय, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यासारख्या उपक्रमांमुळे मुलींविषयीचा लोकांचा दृष्टीकोन बदलत असल्याचे आशादायक चित्र राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ( एनएफएचएस) अहवालातून पुढे आले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार देशातील १५ ते ४९ वयोगटातील ७९ टक्के महिला आणि १५ ते ५४ वयोगटातील ७८ टक्के पुरूषांनी आपल्याला किमान एकतरी मुलगी असावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आर्थिक कारणांमुळे मुलींना ‘ओझे’ समजणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ग्रामीण भाग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील लोकही अपत्य म्हणून मुलगी जन्माला येण्याविषयी सकारात्मक असल्याचे दिसून आले. ‘एनएफएचएस’च्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षांमध्ये लोकांच्या मानसिकतेत हा बदल झाला आहे. यापूर्वी २००५-०६ साली केलेल्या सर्वेक्षणात ७४ टक्के महिला तर ६५ टक्के पुरूषांनी आपल्याला मुलगी हवी असल्याचे म्हटले होते. मात्र, तरीही मुलगाच जन्माला यावा, ही मानसिकता लोकांमध्ये कायम होती.

शहरी स्त्रियांच्या (७५ टक्के) तुलनेत मुलगी जन्माला यावी ही इच्छा ग्रामीण भागातील महिलांमध्ये (८१ टक्के) तीव्र आहे. तर ८५ टक्के अशिक्षित स्त्रिया अपत्य म्हणून मुलींनाच प्राधान्य देतात आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या महिलांपैकी ७२ टक्के महिलांना आपल्या पोटी मुलगी जन्माला यावी, असे वाटते. पुरूषांच्याबाबतीत बोलायचे झाल्यास ग्रामीण भागातील ८० टक्के तर शहरी भागातील ७५ टक्के पुरुषांना मुलगी हवी आहे. अशिक्षित आणि सुशिक्षित पुरूषांच्याबाबतीतही मुलीच्या जन्माविषयीची मानसिकताही महिलांप्रमाणेच आहे. अशिक्षित लोकांपैकी ८३ टक्के पुरूषांना आपल्याला मुलगी व्हावी, असे वाटते. सुशिक्षित पुरूषांच्याबाबतीत (१२ वी पर्यंत शिक्षण) हेच प्रमाण ७४ टक्के इतके आहे.

याशिवाय, धर्मनिहाय तुलना करायची झाल्यास मुस्लिम समाजातील ८१ टक्के , बौद्ध-नवबौद्ध समाजातील ७९ टक्के आणि हिंदूंमधील ७९ टक्के लोकांना अपत्य म्हणून मुलगी जन्माला यावी, असे वाटते. अन्य धर्मीयांमध्ये मुलगी हवी असणाऱ्या लोकांचे प्रमाण तुलनेत जास्त आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या वर्गातील ८६ टक्के महिला आणि ८५ टक्के पुरूषांनी आपल्याला मुलगी असावी, असे म्हटले आहे. आर्थिकदृष्ट्या सधन वर्गात हेच प्रमाण अनुक्रमे ७३ टक्के आणि ७२ टक्के इतके आहे. देशातील ८२ टक्के महिला आणि ८३ टक्के पुरूषांना किमान एकतरी मुलगा हवाच, असे वाटते. तर आपल्याला मुलींपेक्षा जास्त मुले असावीत असे वाटणाऱ्या स्त्री-पुरूषांचे प्रमाण १९ टक्के इतके आहे. याशिवाय, देशातील केवळ ३.५ टक्के लोकांनाच आपल्याला मुलापेक्षा मुली अधिक असाव्यात असे वाटत असल्याची बाब अहवालातून पुढे आली आहे.