देशातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर अशी तिरुपती मंदिराची ख्याती आहे. या मंदिरात दान म्हणून दिलेल्या ५०० आणि १ हजार च्या जुन्या नोटा आता बँकेत जमा करता येणार नाहीत. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार दानाच्या स्वरूपात मंदिरात आलेल्या ८ कोटी २९ लाखांच्या ५०० आणि १ हजाराच्या नोटा बाद ठरल्या आहेत.

५०० आणि १ हजाराच्या नोटा रद्द करू नयेत त्या बँकेत भरण्याची परवानगी देण्यात यावी अशी याचिका आंध्र प्रदेशातले पत्रकार व्ही व्ही. रमणमूर्ती यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या संबंधीचे निर्देश सुप्रीम कोर्टानं आरबीआयला द्यावेत असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र ही याचिका कोर्टानं आज फेटाळली आहे. त्यामुळे या सगळ्या नोटा बाद ठरल्या आहेत.

तिरुपतीला नवस करताना भाविकांनी जुन्या नोटा दानपेटीत टाकल्या आहेत त्या बँकेनं स्वीकारल्या नाहीत तर भक्तांचे नवस पूर्ण होणार नाहीत म्हणून या नोटा बँकेत जमा करण्याची संमती मिळावी असंही या याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. मात्र ही याचिकाच सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. याचिकाकर्त्याच्या याचिकेत असा कोणताच ठोस दावा नाही ज्यानुसार या नोटा बँकेत भरण्याची परवानगी दिली जावी, त्यामुळे ही याचिका फेटाळून लावली जाते आहे असा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

आंध्र प्रदेशातलं तिरूमला तिरूपती व्यंकटेश्वर मंदिरात अनेक भाविकांनी नोटाबंदीनंतरही ५०० आणि १ हजारांच्या नोटा दान म्हणून जमा केल्या होत्या. जगातल्या श्रीमंत मंदिरांपैकी दुसऱ्या क्रमांकाचं मंदिर आहे. या मंदिराची संपत्ती ५० हजार कोटींच्या घरात आहे. तर या मंदिराचं वार्षिक उत्पन्न साधारण ६५० कोटींच्या घरात आहे.

८ नोव्हेंबरला २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करत ५०० आणि १ हजाराच्या नोटा चलनातून बाद असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर जुन्या नोटा बदलण्यासाठी ५० दिवसांचा अवधीही देण्यात आला.

या कालावधीत आणि कालावधीच्या नंतर अनेक भाविकांनी ५०० आणि १ हजारांच्या नोटा तिरूमला तिरूपती देवस्थानाच्या दानपेटीत टाकल्या. या जुन्या नोटांची किंमत ८ कोटी २९ लाख एवढी झाली आहे. या सगळ्या नोटा बँकेत जमा करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टानं द्यावी अशी याचिका पत्रकार व्ही. व्ही. रमणमूर्ती यांनी केली होती. मात्र आता ही याचिका फेटाळण्यात आल्यानं दान म्हणून देण्यात आलेल्या या सगळ्या नोटा मंदिरासाठी बाद ठरल्या आहेत.