ऑस्ट्रेलियातील केर्न्स उपनगरामध्ये एका घरातील आठ मुले शुक्रवारी सकाळी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या घरामध्ये एक महिलांही गंभीर जखमी अवस्थेत आढळली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
केर्न्स उपनगरामध्ये एका घरात महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती क्विन्सलॅंड पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घरामध्ये गेल्यावर त्यांना तिथे १८ महिने ते १५ वर्षे या वयोगटातील आठ मुले मृतावस्थेत असल्याचे आढळले. त्याचबरोबर संबंधित महिलेच्या छातीवर मोठ्या प्रमाणात वार झालेले असल्याचेही पोलीसांना आढळले. यानंतर पोलीसांनी महिलेला तातडीने रुग्णालयात हलवले. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून, तिच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, एकाच घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात लहान मुले मृत्युमुखी पडण्याचे कारण काय, याचा उलगडा अजून झालेला नाही. पोलीस आसपासच्या घरामध्ये या घटनेबद्दल चौकशी करीत आहेत. जखमी महिला आणि मृत मुले यांचे नातेसंबंध काय, हे स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर ही सर्व मुले भावंडे आहेत का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेमुळे कोणत्याही नागरिकांने घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्व परिस्थिती पोलीसांच्या नियंत्रणात असल्याचे पोलीसांनी सांगितले.