पुरीमध्ये झोपडय़ा उडाल्या; कोलकात्यालाही फटका

भुवनेश्वर, कोलकाता : ओदिशात शुक्रवारी ताशी १७५ किलोमीटर वेगाच्या ‘फॅनी ’ चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. नंतर त्याची तीव्रता कमी झाली. या वादळाने आतापर्यंत आठ बळी घेतले असून अनेक कच्ची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक शहरे व खेडी यांना त्याचा फटका बसला.

फॅनी चक्रीवादळ सकाळी आठ वाजता पुरी येथे थडकले. त्यामुळे अनेक झोपडय़ा उडून गेल्या. धार्मिक महत्त्वाचे ठिकाण असलेल्या पुरी शहरात तसेच पश्चिम बंगालमधील कोलकात्यासह काही ठिकाणी त्यामुळे जोरदार पाऊस झाला.

विशेष मदत आयुक्त बी.पी. सेठी यांनी सांगितले की, पुरी, नायगड, केंद्रपाडा या जिल्ह्य़ांत  वादळामुळे तीन जण ठार झाले आहेत. पुरी येथे झाड कोसळून एक किशोरवयीन मुलगा ठार झाला तर नयागड येथे काँक्रिटची इमारत कोसळून एक महिला ठार झाली. केंद्रपाडा येथे मदत छावणीतए का वृद्धेचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

फॅनी  चक्रीवादळाचा डोळा २८ किलोमीटर रूंद होता. त्याचा वेग सुरुवातीला ताशी तीस किलोमीटर होता, पण नंतर तो ताशी १७५ किलोमीटर झाला. यापुढे तो २०० किलोमीटपर्यंत जाऊ शकतो. राजधानी भुवनेश्वरसह अनेक ठिकाणी त्यामुळे झाडे कोसळली तर झोपडय़ा उडून गेल्या.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे उप महानिरीक्षक रणदीप राणा यांनी सांगितले की, प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून आतापर्यंत किरकोळ हानी झाली आहे. राज्य सरकारने दोन दिवसांत १० हजार खेडय़ांतील ११ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून देशातील हा सर्वात मोठा पुनर्वसन उपक्रम होता. चार हजार छावण्यांत त्यांना ठेवण्यात आले आहे.

जमिनीला टेकल्यानंतर हे वादळ खुर्दा, कटक,जयपूर, भद्रक, बालासोर या भागातून गेले. नंतर ते पश्चिम बंगालकडे गेले. भुवनेश्वरमध्ये ताशी १४० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. मोबाइलचे मनोरे काही ठिकाणी कोसळले तर  खांब पडून वीज पुरवठा खंडित झाला. पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केल्यानंतर वादळाचा डोळा आणखी कमकुवत झाला असून वाऱ्यांचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर होता. मच्छिमारांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.  पश्चिम मिदनापूर, उत्तर व दक्षिण २४ परगणा, हावडा, हुगळी, झारग्राम, कोलकाता, सुंदर बन यांना वादळाचा तडाखा बसू शकतो.

वादळग्रस्त राज्यांना १ हजार कोटींची मदत मंजूर – पंतप्रधान मोदी

हिंदाऊन शहर, राजस्थान : फॅनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांना १ हजार कोटींची मदत आधीच जाहीर करण्यात आली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे जाहीर सभेत सांगितले. ते म्हणाले की, कुठल्याही अडचणीच्या काळात सरकार लोकांच्या पाठीशी आहे. वादळाबाबत आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात अनेक उपायोजना करण्यात आल्या आहेत. ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुडुचेरी, या राज्यांमध्ये लाखो कुटुंबाना वादळाचा फटका बसला असून केंद्र सरकार या परिस्थितीत राज्य सरकारांच्या संपर्कात आहे. काही वेळापूर्वीच अधिकाऱ्यांकडून वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आपण माहिती घेतली असून १००० कोटी रूपये आधीच मंजूर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व भारतीय तटरक्षक दल, नौदल व लष्कर हे मदत कार्यात सहभागी आहेत असे सांगून मोदी म्हणाले की, केंद्र  सरकार लोकांच्या पाठीशी आहे. वादळाचा फटका बसलेल्या कुटुंबांना मदत केली जाईल.

वाहतूक कोलमडली; शाळा बंद 

फॅनी चक्रीवादळाने शुक्रवारी ओदिशात भूस्पर्श केल्यानंतर  कोलकात्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. फॅनी वादळ शुक्रवारी सायंकाळी पश्चिम बंगालमध्ये पोहोचले. त्याआधी सकाळपासून जोरदार वाऱ्यांसह पाऊस सुरू झाला. कोलकात्यातील वाहतूक कोलमडली असून उत्तर व दक्षिण कोलकात्यात वाहतूक कोंडी झाली आहे. राजकीय पक्षांनी प्रचार सभा रद्द केल्या असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. सरकारी शाळांना सुटी देण्यात आली आहे.

विमानतळ बंद

भुवनेश्वर व कोलकाता येथील विमानतळ बंद करण्यात आले असून कोलकाता येथून  शुक्रवारी दुपारी ३ ते शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत विमानसेवा बंद करण्यात आली आहे, असे हवाई वाहतूक महासंचालनालयाने म्हटले आहे. हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले की, फॅनी वादळाचा फटका बसलेल्या प्रवाशांकडे विमान कंपन्यांनी लक्ष पुरवावे.अडकून पडलेल्या  प्रवाशांच्या मदतीसाठी आम्ही तत्परतेने काम करीत आहोत.

रेल्वेगाडय़ा रद्द

कोलकाता ते चेन्नई मार्गावरील २२० रेल्वेगाडय़ा शनिवापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. कोलकात्याहून जाणाऱ्या  अनेक गाडय़ा व विमानतळावरून जाणारी विमाने शुक्रवार दुपारी ३ ते शनिवारी सकाळी आठ पर्यंत रद्द असतील.

ममता बॅनर्जी यांच्या सभा रद्द

कोलकाता : फॅनी या चक्रीवादळाच्या फटक्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या शुक्रवारच्या  प्रचार सभा रद्द केल्या आहेत, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. बॅनर्जी या पश्चिम मिदनापूर जिल्ह्य़ातील खरगपूर येथून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.  राज्य सरकारने सतर्कतेचा इशारा दिला असून अतितीव्र चक्रीवादळास तोंड देण्यासाठी सज्ज रहावे, असे म्हटले आहे. महापौर  फिरहाद हकीम हे कोलकाता महापालिकेच्या मुख्यालयातून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथकाशी ते समन्वय साधून आहेत.  सर्व जिल्ह्य़ांमध्ये व्यवस्था करण्यात आली असून मदत साहित्य जिल्ह्य़ांना पाठवण्यात आले आहे.

पेट्रोल, डिझेलपुरवठा सुरळीत

नवी दिल्ली : फॅनी वादळाचा फटका बसत असलेल्या ओडिशा व पश्चिम  बंगाल या राज्यांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा अखंडितपणे सुरू  राहील, याची इंडियन ऑइल कार्पोरेशनने  काळजी घेतली आहे. कंपनीच्या सूत्रांनी शुक्रवारी सांगितले,की ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांना पेट्रोल डिझेलचा तुटवडा पडू देणार नाही. अजून तरी पूर्वेकडील या राज्यात पुरवठा सुरळीत आहे. २०१४ नंतर प्रथमच या राज्यांना  फॅनी या घातक चक्रीवादळाचा सामना करावा लागत आहे. ओडिशातील पारादीप येथे आयओसीचा वार्षिक १५ दशलक्ष टन तेल शुद्धीकरणाचा कारखाना सुरू असून त्यात व्यत्यय आलेला नाही. ताशी २०० कि.मी वेगाच्या वादळाचा सामना करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन तेलशुद्धीकरण कारखान्यात खास नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. तेथे सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.