पाकूर जिल्ह्य़ात चार शालेय मुलींवर झालेल्या बलात्कारप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आल्याचे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मंगळवारी येथे सांगितले. आरोपींनी या मुलींना जबरदस्तीने शाळेच्या नजीक असलेल्या निर्जन ठिकाणी नेले. बलात्काराचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून ज्या शाळेच्या नजीक हा प्रकार घडला त्या परिसराला भेट देऊन चौकशी करणार असल्याचे सोरेन यांनी सांगितले. या प्रकरणातील एकूण नऊ आरोपींपैकी आठ जणांना अटक करण्यात आली असून फरारी आरोपीला लवकरच पकडण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. अल्पवयीन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार घेईल आणि त्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येईल, असेही सोरेन म्हणाले.