मडिकेरी : कर्नाटकच्या मडिकेरी शहरात गेल्या आठवडय़ात टाळेबंदीतील निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल मानसिकरीत्या अस्थिर असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीस पोलिसांनी  केलेल्या मारहाणीत तो मरण पावला. या प्रकरणी ८ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या  व्यक्तीचा भाऊ रॉबिन डिसूझा याने केलेल्या तक्रारीवरून संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कर्नाटक दक्षिण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी दिली. मानसिकरीत्या अस्थिर असलेले रॉय डिसूझा हे त्यांच्या आईसोबत राहात होते. ८ जूनला रॉय हे उशिरा रात्री घरून पळून गेले. एका पोलिसाने त्यांना भटकताना पाहिले आणि टाळेबंदी असतानाही विनाकारण भटकत असताना मारहाण केली. ९ जूनच्या सकाळी त्यांच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावण्यातआले, त्या वेळी रॉय हे बेशुद्धावस्थेत दिसले.  नंतर रुग्णालयात  त्यांचा मृत्यू ओढवला.