गोपेश्वार (उत्तराखंड) : उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेवर झालेल्या हिमस्खलनात सीमा रस्ते संघटनेचे आठ कामगार ठार झाल्याचे शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
नीती खोऱ्यातील सुमना परिसरातून शुक्रवारी रात्री दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले तर शनिवारी आणखी सहा मृतदेह मिळाले, असे जिल्हा दंडाधिकारी स्वाती भादुरिया यांनी सांगितले. तर जखमी झालेल्या चार जणांची सुटका करण्यात आली, असे राज्याचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी जोशीमठ येथे वार्ताहरांना सांगितले. हिमस्खलन झाले त्यावेळी शुक्रवारी ४०० हून अधिक कामगार काम करीत होते त्यापैकी जवळपास ३९१ कामगार भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या छावण्यांमध्ये सुखरूप पोहोचले, असल्याचेही रावत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या परिसराची हवाई पाहणी केली. सुमना परिसरात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या हिमस्खलनात ८० जण ठार झाले होते तर १२६ जण बेपत्ता झाले होते.

ओएनजीसीच्या दोन कर्मचाऱ्यांची सुटका
गुवाहाटी : नागालॅण्डमधील भारत-म्यानमार सीमेवर शनिवारी झालेल्या चकमकीनंतर तेल आणि नैसर्गिक वायू आयोगाच्या (ओएनजीसी) दोन अपहृत कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली असून तिसऱ्या कर्मचाऱ्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे आसामचे पोलीस प्रमुख भास्कर ज्योती महंत यांनी सांगितले. आसाम-नागालॅण्ड सीमेवरील शिवसागर जिल्ह्यातील लाकवा तेल विहिरीजवळून उल्फाच्या (आय) संशयित बंडखोरांनी बुधवारी ओएनजीसीच्या तीन कर्मचाऱ्यांचे अपहरण केले होते. शनिवारी नागालॅण्डजवळच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मोन जिल्ह्यातील जंगलात ही चकमक झडली. त्यानंतर तेथून दोघा कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली, तर तिसऱ्या कर्मचाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे, असे महंत यांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये करोनाचे वाढते बळी
इस्लामाबाद : पाकिस्तानात करोना विषाणूने गेल्या २४ तासांत १५७ बळी गेले आहेत. गेल्या वर्षापासूनचा हा उच्चांक मानला जात आहे. नवीन रुग्णांची संख्या ५९०८ झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने म्हटले आहे की, १५७ पैकी ५३ जण करोनाने व्हेंटिलेटरवर असता मरण पावले. पाकिस्तानात एकूण १५७ बळी २४ तासांत गेले आहेत. २० जूनपासूनचा हा उच्चांक असून त्यावेळी १५३ जण करोनाने मरण पावले आहेत. पाकिस्तानात करोनाने १६९९९ बळी गेले असून एकूण रुग्णांची संख्या ७ लाख ९० हजार १६ आहे. आतापर्यंत पाकिस्तानात ६ लाख ८६ हजार ४८८ जण बरे झाले असून पाकिस्तानात ८६ हजार ५२९ जण उपचाराधीन आहेत.

मध्य प्रदेश : आमदाराचे करोनाने निधन
इंदूर : मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या आमदार कलावती भुरिया (४९) यांचे शनिवारी पहाटे करोनामुळे निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, असे त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले. मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील जोबात विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलावती भुरिया यांना १२ दिवसांपूर्वी शाल्बी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या फुप्फुसांत ७० टक्के संसर्ग झाला होता, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांचे निधन झाले, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विवेक जोशी यांनी सांगितले.