आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे आज (गुरुवारी) पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली. यामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडोजण आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून  बचावकार्य सुरू आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी (डीएमएचओ) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विषारी वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांमध्ये जळजळ व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशम विभागाचे वाहन, रुग्णवाहिका व पोलीस दाखल झाले आहेत.

एलजी पॉलिमर कंपनीतून विषारी वायू गळती झाली. ज्यामुळे आसपासच्या तीन किलोमीटर अंतरावरील परिसरावर याचा परिणाम जाणवला. ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी वी विनय चंद हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांनी सांगितले की, काहीजणांना श्वसनास त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन दिला जात आहे.

या दुर्घटनेमुळे बेशुद्ध पडलेले तसेच श्वसनास त्रास होऊ लागलेल्या शेकडो जणांना शहरातली किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलं व वृद्धांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. तसेच, दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी घटेनेबद्दल ट्विट केलं आहे. घटनास्थळाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले असून, गृहमंत्राल व एनडीएमआयशी (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) याबाबत बोलणं झालं असल्याचंही ते म्हणाले. मी विशाखापट्टणममधील प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी व कल्याणार्थ प्रार्थना करतो, ”असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींनी एडीएमएबरोबर बैठक बोलावली आहे. तसेच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी देखील पंतप्रधान मोदींनी दुर्घनटेनेच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली असून केंद्राकडून सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी देखील विशाखापट्टणम येथील परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगितले असून, विषारी वायू गळतीने प्रकृती बिघडलेल्यांना लवकर बरे वाटावे अशी त्यांनी प्रार्थना केली आहे.