देशातील करोना बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत असून, काही राज्यातील परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. देशातील उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्लीसह आठ राज्यांमध्ये आहेत. त्यात देशातील ४९ जिल्ह्यात हे रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. त्याचबरोबर देशातील एकूण मृतांपैकी ८६ टक्के रुग्ण महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील आहेत, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

करोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची बैठक पार पडली. यावेळी करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर अधिक असलेल्या भागावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आलं. भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या स्थानी असला, तरी इतर देशांशी तुलना केल्यास भारतातील रुग्णसंख्या कमी आहे. त्याचबरोबर देशात सध्या उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले,” करोनामुळे झालेल्या मृत्यूपैकी १५ टक्के मृत्यू ४५ वर्षाखालील असलेल्या रुग्णांचे आहेत. तर ५३ टक्के मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे आहेत. ज्यांचं वय ६० वर्षापेक्षा अधिक आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आज झालेल्या मंत्रीगटाच्या बैठकीनंतर स्पष्ट केलं आहे की, भारत अजूनही समूह संक्रमणाच्या टप्प्यावर पोहोचलेला नाही. काही भागात जास्त प्रादुर्भाव झालेला आहे. ४९ जिल्ह्यांमध्येच देशातील ८० टक्के रुग्ण आहेत,” असं आरोग्य सचिव म्हणाले.

“प्लाझ्मा थेरपी ही संशोधनात्मक थेरेपी म्हणून वापरली जात आहे. तिचा वापर कुठे करायचा यांच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नेतृत्वाखाली टप्प्याटप्प्यानं चाचण्या केल्या जात आहेत. दोन पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसींची प्राण्यांवरील चाचणी पुर्ण करण्यात आली आहे. मान्यता मिळाल्यानंतर या चाचण्यांचे निष्कर्ष डीसीजीआयकडे देण्यात आले आहेत. आता या लसींची माणसांवर चाचणी होऊ शकेल,” अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली.