कर्नाटकातील सत्तेसाठीचा संघर्ष मागील आठवड्यात संपूर्ण देशभराने पाहिला. अत्यंत वेगवान घडामोडीनंतर कुमारस्वामी देवेगौडा हे आता सत्ता स्थापन करणार आहेत. दरम्यान, निकालानंतर पुन्हा एकदा इव्हीएमविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवला आहे. याच घडामोडीत आता व्हीव्हीपॅटबाबत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. विजयपूर जिल्ह्यातील एका मजुराच्या घरात ८ व्हीव्हीपॅटचे कव्हर्स आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या कव्हर्सचा वापर हे मजूर कपडे ठेवण्यासाठी करत होते. याबाबत पुढील तपास सुरू आहे. मजुराच्या घरी सापडलेल्या मशीन नसून व्हीव्हीपॅटचे ते कव्हर असल्याचे पोलिसांनी म्हटले. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचेही ते म्हणाले. या व्हीव्हीपॅटला बॅटरी नसल्याच्या वृत्तास पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.

नुकताच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा १०४ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. परंतु, बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अवघ्या ५५ तासांत राजीनामा दिला. आता बुधवारी जेडीएस आणि काँग्रेस यांचे आघाडी सरकार सत्तेवर येईल. कुमारस्वामी देवेगौडा हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. काँग्रेसला ७८ तर जेडीएसला ३७ जागा मिळाल्या आहेत.