नोटाबंदीमुळे झारखंडमध्ये नक्षलवाद्यांना ८० कोटींचा फटका बसला आहे, असे अलीकडच्या माहितीवरून दिसून आले. गेल्या ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर नक्षलवाद्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या गेल्या आहेत, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. नरेंद्र मोदी सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या असून, त्याचा नक्षलवादी कारवायांवर परिणाम झाला आहे, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक ए. के. मलिक यांनी सांगितले. गुप्तचरांनी दिलेल्या अहवालानुसार नक्षलवाद्यांकडील ८० कोटींची रोकड आता काही कामाची राहिलेली नाही. त्यांना ती नष्ट करण्यावाचून पर्याय उरला नाही. नक्षलवाद्यांकडचा पैसा नष्ट झाल्याने त्यांच्या आर्थिक नाडय़ा आता आवळल्या गेल्या आहेत. आता त्यांना लुटालूट करण्याचा मार्ग पत्करण्याची वेळ आली आहे.

तथापि, राज्य पोलिसांनी त्यांची कारस्थाने हाणून पाडण्यास सज्जता ठेवली आहे. नक्षलवादी तीन वर्षांपूर्वी १४० कोटींची खंडणी गोळा करीत होते, पण नक्षलविरोधी मोहिमांमुळे हे प्रमाण १०० कोटींपर्यंत खाली आले आहे.

एक वर्षांच्या खर्चासाठी नक्षलवाद्यांनी १०० कोटी रुपये वेगळे ठेवले होते, पण नोटाबंदीमुळे ते निकामी झाले. माओवादी व नक्षलवादी यांना कार्यकर्ते, गावकरी व शेतकरी यांच्या माध्यमातून २० कोटी रुपये बदलून घेता येणे शक्य झाले. राज्यात नक्षलवाद्यांनी जबरदस्तीने नोटा बदलून घेण्याचे १०० प्रकार झाले, पण ते हाणून पाडण्यात आले. त्यात पोलिसांनी मोठी कामगिरी केली. गेल्या वर्षीच्या मोहिमेत एकूण ३७ नक्षलवादी मारले गेले, तर १५४६ जण शरण आले, असे मलिक यांनी सांगितले.