शेती करण्यात आलेल्या अडचणींमुळे यावर्षी देशातील ८०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत, अशी माहिती शुक्रवारी संसदेत देण्यात आली.
शेतीविषयक अडचणींमुळे यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रात ७२४ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद करण्यात आली. तेलंगणात ८४, कर्नाटकात १९, तर गुजरात, केरळ व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्येकी तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली, अशी माहिती कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदरिया यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
कृषी क्षेत्राला नवी संजीवनी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची परिस्थिती कायमस्वरूपी सुधारण्यासाठी सार्वजनिक गुंतवणूक वाढवणे, शेतीच्या पद्धती सुधारणे आणि शेतमालाचे मार्केटिंग करणे यांसारखे उपाय केंद्र सरकारने केले आहेत. तथापि, घटनेनुसार शेती हा राज्यांच्या सूचीतील विषय असून कृषिक्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांचे कल्याण यासाठी राज्येच प्राथमिकत: जबाबदार आहेत, असे कृषी राज्यमंत्री म्हणाले.