एका दिवसात आठ हजार रुग्णांची भर; बरे झालेले रुग्ण ११ हजार

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच रोज वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा रोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त राहिली. गेल्या २४ तासांत  ११,२६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे देशभरात एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८२,३७० झाली आहे.

टाळेबंदीचा चौथा टप्पा संपत असताना, करोना रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन वाढ होत आहे.  शुक्रवारी दिवसभरात सुमारे आठ हजार नव्या रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत ७,९६४ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे देशभरात एकूण रुग्णांची संख्या आता एक लाख ७३ हजार ७६३ इतकी झाली आहे. गुरुवारी दिवसभरात नव्या रुग्णांनी ७ हजारचा (७,४७६) आकडा पार केला होता. त्याआधी आठवडाभर प्रतिदिन रुग्णांच्या संख्येत सहा हजारांनी वाढ झाली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४२ टक्क्यांवरून ४७.४ टक्क्यांवर गेले आहे. एका दिवसात हे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले. मात्र, गेल्या २४ तासांत मृत्यूची संख्याही सर्वाधिक आहे. रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दोनशेहून म्हणजेच २६५ इतका आहे. करोनामुळे एकूण ४,९७१ मृत्यू झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत मात्र रुग्णदुपटीचे प्रमाण १५.४ दिवसांवर पोहोचले आहे. मृत्यूचे प्रमाण २.८६ टक्के आहे.

‘कायमस्वरूपी टाळेबंदी असू शकत नाही’

टाळेबंदीच्या चौथ्या टप्पा अन्य तीन टप्प्यांपेक्षा शिथिल करण्यात आल्याने करोनाच्या रुग्णांमध्ये गेल्या आठवडय़ापासून प्रतिदिन सहा हजारांची वाढ होत आहे. दिल्लीतही सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांची संख्या एक हजारानी वाढली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, रुग्ण वाढत असले तरी राज्य सरकारने पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत; शिवाय, कायमस्वरूपी टाळेबंदी असू शकत नाही, असे मत व्यक्त केले.

२४ तासांतील सर्वाधिक वाढ

आसाम : १६८ (१९.६३ टक्के)

तेलंगणा : १६९ (७.४९ टक्के)

दिल्ली : ११०५ (६.७९ टक्के)

प. बंगाल : २७७ (६.११ टक्के)

तमिळनाडू : ८७४ (४.५१ टक्के)

महाराष्ट्र : २६८२ (४.५० टक्के)

राजस्थान : २९८ (३.६९ टक्के)

गुजरात : ३७२ (२.३९ टक्के)

(गेल्या २४ तासांत आसाममध्ये रुग्णवाढीची टक्केवारी जास्त दिसत असली तरी एकूण रुग्णांची संख्या कमी आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली या राज्यांमध्ये प्रत्यक्ष रुग्णांचा आकडा मोठा आहे.)