उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर हिंसाचारात पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येच्या चौकशीऐवजी गोहत्येच्या आरोपींना पकडण्याच्या दृष्टीकोनातून तपास सुरू असल्याचा आरोप करत उत्तर प्रदेशच्या 83 माजी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या अधिकाऱ्यांनी एका खुल्या पत्राद्वारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीये. राजीनाम्याची मागणी केलेले सर्व अधिकारी 4 ते 5 महिन्यांपूर्वीच निवृत्त झाले आहेत.

हिंसाचारामध्ये सहभागी असलेल्या आरोपींना पकडण्याऐवजी पोलीस गोहत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना पकडण्यात व्यस्त आहे. पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्यासह दोन जणांच्या हत्याप्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने सुरू आहे. सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री योगी यांनीही ही जातीय दंगल असल्याचं म्हटलं होतं. त्यावर सविस्तर चर्चाही झाली होती. तरीही आता मुख्य मुद्द्यावरुन लक्ष हटवून गोहत्येच्या आरोपींना पकडण्याच्या कामाला पोलीस लागलेत. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नाहीये असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

बुलंदशहरमध्ये 3 डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्यासह सुमित नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता. हिंसेप्रकरणी आतापर्यंत 18 आरोपींना अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या हिंसाचारप्रकरणी 22 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत असलेल्या जितेंद्र मलिक ऊर्फ जितू फौजी याला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे.