भारतात करोना विषाणूचा प्रभाव अद्याप कायम आहे. आजवर देशात करोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३७४ वर पोहोचली असून ७७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, एकूण करोनाबाधितांमध्ये ८३ टक्के रुग्ण हे ६० वर्षांखालील असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आलं आहे.

यामध्ये देशात सर्वाधिक ४१ टक्के करोनाबाधित रुग्ण हे २१ ते ४० टक्के वयोगटातील आहेत. मात्र, ज्येष्ठांना या आजाराचा सर्वात जास्त धोका असल्याचे म्हटले जात असले तरी एकूण बाधित रुग्णांपैकी आत्तापर्यंत ६० वर्षांवरील केवळ १७ टक्के रुग्ण करोनाग्रस्त आढळून आले आहेत. दरम्यान, २१ ते ४० वर्षे वयाच्या श्रेणीमध्ये सर्वाधिक लोक हे परदेशातून प्रवास करुन आलेले आहेत. भारतातील करोना दाखल होण्याचे ते मुख्य स्त्रोत आहेत. यामध्ये परदेशात काम करणारे व्यावसायिक आणि विद्यार्थ्यी यांचा समावेश आहे.

दरम्यान, मृत्यूचा दर हा ज्येष्ठ व्यक्तींमध्ये अधिक असून मृतांच्या अहवालानुसार अधिक वयाबरोबरच मधुमेह, हृदयरोग आणि अतितणावग्रस्त व्यक्तींमध्येच मृत्युचे प्रमाण अधिक आहे. मात्र, आरोग्य मंत्रालयाने अद्याप करोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे अशा रुग्णांच्या वायाची माहिती उघड केलेली नाही.

वयानुसार, करोनाग्रस्तांचे विश्लेषण केल्यास ८.६१ टक्के पॉझिटिव्ह केसेस या ० ते २० वर्षे वयोगटातील लोकांमध्ये आढळून आल्या आहेत. ४१.८८ टक्के केसेस या २१ ते ४० वयोगटातील आहेत. तर ३२.८२ टक्के केसेस या ४१-६० या वयोगटातील आहेत. तसेच १६.६९ टक्के रुग्ण हे ६० वर्षे वयोगटापेक्षा अधिक आहेत. त्याचबरोबर, भारतात केरळ, मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये ५८ टक्के करोनाच्या गंभीर केसेसही आढळून आल्या आहेत.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, “आपण सध्या अतिसंसर्गजन्य आणि वेगानं सामाजात पसरणाऱ्या आजाराशी लढा देत आहोत. रोजच्या रोज आपण याविरोधात पावलं टाकत आहोत. मात्र, सध्या भारतात इतर देशांच्या तुलनेत करोनाबाधितांची केसेस दुप्पट होण्यात प्रमाण कमी आहे.”